पर्यटन खाते, पर्वरी रायझिंग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदवशीय कार्यक्रमाचे आयोजन : नागरिकांनी घेतला मनमुराद आस्वाद

पर्वरी : येथील राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या ‘सर्व्हिस रोड’ वर आज संध्याकाळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते नोमोझो 4.0 (नो मोटर झोन) या चौथ्या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात सुरुवात झाली. यावेळी हळदोणा आमदार कार्लूस पेरेरा, साळगाव आमदार केदार नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, पेन्ह दी फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, सुकुर सरपंच सोनिया पेडणेकर,साल्वादोर दी मुंद माजी सरपंच संदीप साळगावकर, मंडळ अध्यक्ष किशोर अस्नोडकर, पर्यटन खात्याचे संचालक अभिषेक, राजेंद्र पार्सेकर, तिन्ही पंचयातीचे पंच तसेच पर्वरी परिसरातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यटन खाते व पर्वरी रायझिंग यांच्या संयुक्त विद्यमाने या एक दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाहनमुक्त पथ व समाजाच्या सर्व थरातील नागरिकांना एकत्रित आणणे हा या ‘नोमोझो’ कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आज आपण स्वत:च्या हक्काविषयी झगडतो पण आपली कर्तव्ये विसरलो आहोत. प्रदूषणमुक्त परिसर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. गोवा प्रदूषण मुक्त करणार, अशी केवळ घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे. आजच्या ‘वॉट्स अप’ च्या जमान्यात आजचा तऊण वर्ग पूर्ण गुरफटलेला आहे, त्याला अशा उपक्रमामुळे पारंपारिक नृत्य, खेळांची ओळख होण्यास मदत होते. या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे जेष्ठ नागरिकांना आपल्या शारीरिक दुखण्यातून काही काळ मुक्तता मिळेल.अशा उपक्रमातून समाजीक नाते घट्ट होण्यास मदत होईल.असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले ‘नोमोझो’ हा प्रदूषण मुक्त परिसराच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, असे उपक्रम गोव्यातील अन्य तालुक्मयात व्हायला पाहिजेत. आज आपण व्यक्तिगत जीवनात इतका गुरफटलो असल्याने आपण सामाजिक जीवनाला मुकलो आहोत. मोबाईलमुळे आपण आपापसातील संवादाला मुकलो आहोत. अशा उपक्रमामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. तसेच पारंपरिक खेळ, कलागुण यांना पुनर्जीवित करण्याची संधी मिळते. त्यामुळे असे उपक्रम व्हायलाच पाहिजे, असे प्रतिपादन आमदार कार्लूस पेरेरा यांनी केले.
नोमोझो या कार्यक्रमामुळे समाजातील सर्व लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. त्यामुळे मंत्री रोहन खंवटे यांनी सुरू केलेला हा उपक्रम खूप चांगला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे म्हणाले. ‘नोमोझो’ ही आमचे मंत्री खंवटे यांची मूळ कल्पना आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आज आकार घेत आहे. तसेच लोक मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. आजच्या धकाधकी आणि तणावाच्या जीवनात काही क्षणासाठी अशा उपक्रमाची निनांत गरज आहे, असे सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी सांगितले. गोवा क्रिकेट अकादमी ते अपॅडील स्कूलपर्यंतच्या सर्व्हिस रोड वर आज पारंपरिक गोमंतकीय खेळापासून आधुनिक खेळ, योग, नृत्य पथक, रोमटामेळ, पाश्चिमात्य संगीत, शैक्षणिक स्टॉल्स, पथनाट्या, विविध खाद्य प्रकार यांचा नागरिकांनी मनमुराद आस्वाद घेतला. अनेक कलाकारांनी स्वच्छेने सहभाग घेऊन आपली कला सादर केली. याव्यतिरिक्त सुमारे 40 विविध स्टॉल्स होते. त्यात काही स्टॉल्स स्वयंसहाय्य गटांचे होते. यावेळी विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह क्रीडा प्रकार सादर केले. त्यात विविध पारंपरिक खाद्यपदार्थ होते. लहान मुलांनी सायकलिंग, स्केटिंग यांचा मनमुराद आनंद लुटला. बाल भवनाच्या मुलांनी पारंपरिक नृत्य सादर केली. आजची संध्याकाळ पर्वरी आणि परिसरातील लोकांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून काही वेळ काढून या र्काक्रमाचा आनंद घेतला. तसेच या कार्यक्रमात देशी तसेच विदेशी पर्यटकही सहभागी झाले होते.









