प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न : उपसभापती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी गुरुवारी फेटाळला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली ही नोटीस म्हणजे विरोधकांची चुकीची चाल आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी असून ती केवळ सभापतींची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने आणण्यात आली, अशी टिप्पणी उपसभापतींनी केली आहे.
महाभियोगाची नोटीस हा देशाच्या संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याच्या आणि विद्यमान उपराष्ट्रपतींची प्रतिमा डागाळण्याच्या कटाचा एक भाग आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी (10 डिसेंबर) विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाची नोटीस विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांना दिली होती. खुद्द पी. सी. मोदी यांनी गुरुवारी उपसभापतींचे उत्तर सभागृहात मांडले.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर ‘इंडिया’ आघाडीने 11 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘राज्यसभेत सभापती महोदय हे शाळेच्या मुख्याध्यापकासारखे वागतात. विरोधी पक्षाच्या खासदाराने 5 मिनिटे भाषण केले तर ते त्यावर 10 मिनिटे भाष्य करतात. सभागृहातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे सभापती आपले विरोधक म्हणून पाहतात. ज्येष्ठ असोत की कनिष्ठ, आक्षेपार्ह वक्तव्य करून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतात. त्यांच्या वागणुकीमुळे आम्हाला अविश्वास ठराव आणावा लागला आहे.’ असे म्हटले होते.
मुद्दा वळवण्याचा प्रयत्न : जे. पी. नड्डा
विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी टिप्पणी केली होती. राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न हा मुद्दा वळवण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली होती.









