आपल्याला तयार राहावे लागेल : लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा गंभीर इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्र पाकिस्तानसोबत लवकरच पुन्हा युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढचे युद्ध लवकरच होऊ शकते. आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल आणि यावेळी आपल्याला ही लढाई संयुक्तपणे लढावी लागेल, असे स्पष्ट केले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्त्वाचे भाष्य करताना सरकारने आपल्याला मोकळीक दिल्यामुळे मोठे यश मिळाले, असेही जनरल द्विवेदी म्हणाले. ते आयआयटी मद्रास येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.
वायुदल प्रमुखांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत अनेक बाबींचा खुलासा केला असताना आता लष्करप्रमुखांनीही अनेक गोष्टींवर भाष्य केले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी आमची प्रत्येक चाल बुद्धिबळातील खेळाप्रमाणे होती. बुद्धिबळामध्ये आपल्याला माहित नसते की शत्रूची पुढची चाल काय असेल आणि आपण काय करणार आहोत. त्याचप्रमाणे, पाकिस्तानला देखील आमच्या हालचालीची माहिती नव्हती, असे जनरल द्विवेदी म्हणाले. अशा प्रकारच्या संघर्षाला ‘ग्रे झोन’ म्हणतात. याचा अर्थ असा की आम्ही पारंपरिक संघर्ष न करता वेगळी चाल खेळत असतो, असे द्विवेदी यांनी सांगितले. लष्करप्रमुखांनी आयआयटी मद्रास येथे ‘अग्निशोध’ – इंडियन आर्मी रिसर्च सेल (आयएआरसी) च्या उद्घाटनादरम्यान अनेक बाबी विषद केल्या. यासंबंधीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
ऑपरेशन सिंदूरवर बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर भारतीय सुरक्षा दल अधिकच सतर्क झाले. या मोठ्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रणनीती हाती घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. 23 एप्रिल रोजी दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वजण एकत्र बसलो. संरक्षणमंत्र्यांनी पहिल्यांदाच ‘आता पुरे झाले’ असा इसारा देत काही महत्त्वाचे निर्देश दिले. तिन्ही सुरक्षा दल प्रमुखांनी आता एकमताने काहीतरी करायला हवे यावर चर्चा केली. सरकारकडूनही या दहशतवादविरोधी कारवाईला पाठबळ मिळत गेले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, सशस्त्र दलांना मोकळीक देण्यात आली होती, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.
25 एप्रिल रोजी नियोजन, 29 एप्रिलला पंतप्रधान भेट
25 एप्रिल रोजी आम्ही नॉर्दर्न कमांडला भेट दिली. येथे आम्ही पाकिस्तानवर कारवाई करण्याची योजना आखली. अनेक दहशतवादी तळांची माहिती जमा करून 29 एप्रिल रोजी आम्ही पंतप्रधान मोदींना भेटलो अन् त्यानंतर पुढील कार्यवाहीला अधिकच वेग प्राप्त झाला. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम पूर्ण करण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे छोटेसे नाव संपूर्ण देशाला कसे जोडते हे महत्त्वाचे ठरले, असे जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
‘अग्नि शोध’ म्हणजे काय?
‘अग्नि शोध’- भारतीय लष्कर संशोधन कक्ष (आयएआरसी) हे संरक्षण तंत्रज्ञानातील एक मोठे पाऊल आहे. त्याचा हेतू लष्करी कर्मचाऱ्यांना अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सायबर सुरक्षा, क्वांटम कॉम्प्युटिंग, वायरलेस कम्युनिकेशन आणि मानवरहित प्रणाली यासारख्या क्षेत्रात कुशल बनवणे आहे. या माध्यमातून तंत्रज्ञान क्षमता असलेली एक शक्ती निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
वायुसेना प्रमुखांना एस-400 चा अभिमान
यापूर्वी, भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शनिवारी खुलासा करताना ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता आणि त्यांची पाच विमान पाडल्याचे जाहीर केले होते. यासोबतच अनेक एअरबेस देखील नष्ट करण्यात आले होते. भारताने पाडलेल्या पाकिस्तानी विमानांमध्ये पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने होती. याशिवाय, भारतीय लष्कराने एक पाळत ठेवणारे विमानही पाडले होते. भारताच्या एस-400 हवाई संरक्षण प्रणालीने यामध्ये मोठे योगदान दिले होते.









