सांगली :
जिल्हा परिषदेचे दोन्ही प्रवेशद्वार १० वाजता बंद करण्याची सूचना नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मंगळवारी सकाळी दिली. पदभार स्विकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जि. प. मध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलाच दणका दिला. पहिलाच दिवस असल्याने समज देऊन एन्ट्री देण्यात आली. मात्र बुधवारपासून कारवाईचा इशाराही नरवाडे यांनी दिला आहे.
सीईओ नरवाडे यांनी सोमवारी पदभार स्विकारला. त्यानंतर विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कार्यालयीन वेळेत हजर रहा, कामे वेळेत करा अशा सूचना दिल्या. त्यानुसार स्वतः सीईओ ९.४५च्या अगोदर झेडपीत हजर होते. १० वाजता दोन्ही प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याची सूचना त्यांनी दिली. यामुळे उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली. उद्यापासून वेळेत येतो, पण आता आत सोडा अशी विनंती काहींनी केली. सव्वादहाच्या सुमारास रवतः सीईओ नरवाडे प्रवेशद्वारावर हजर झाले. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. काहीही झाले तरी खातेप्रमुख असो अथवा कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहिलेच पाहिले, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या. पहिलाच दिवस असल्याने समज देतो उद्यापासून सुधारणा करा अन्यथा कारवाई करणार, असा इशारा देऊन प्रवेशद्वार उघडण्यात आले.
सीईओ नरवाडे यांनी दुसऱ्याच दिवशी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका दिल्याने झेडपीत दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.
- ये रे माझ्या मागल्या
जिल्हा परिषदेमध्ये नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या ३९७ आहे. त्यापैकी २५ कर्मचारी मंगळवारी उशिरा आले. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ आहे. मात्र अनेक कर्मचारी अकरा वाजले तरी हजर नसतात. काही महिन्यांपूर्वी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे उद्योग सुरू आहे. त्यामुळे पंधरा दिवसांतून एकदा झाडाझडती घेण्याची मागणी होत आहे.








