सांगली :
आरोप करून जेरीस आणून मग पक्षात घ्यावयाचे ही राजकारणीची सध्या नवीनच पध्दत सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपाचे नाव न घेता पत्रकारांशी बोलताना केली. बळजबरीने धर्मपरिवर्तन करणे ही बाब गंभीर आहे. पोलीसांकडे त्याचे पुरावे असल्यास समोर आणावे अशीही मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा बुधवारी सांगलीत मेळावा झाला. यावेळी नाशिक येथील सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, सध्या राजकारणाची नवीनच पध्दत सुरू झाली आहे. लोकही विसरतात आणि पुन्हा नवी इनिंग सुरू होते. जे प्रवेश देतात त्यांचेच विधानसभेतील भाषण बघितले तर लोकांना ते कळतं. पक्ष प्रवेशाच्या कामात त्यांचे सरकार चालविण्याकडे दुर्लक्ष झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, सर्वांनाच सत्तेत जाण्याची घाई झाली आहे. प्रवेश देण्याच्या कामाने त्यांच दुर्लक्ष होत असावं.
कुपवाड येथील ऋतुजा राजगे हिच्या धर्मातंराच्या प्रकरणावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या व्यक्त्यावर जयंत पाटील म्हणाले, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. पण बळजबरीने धर्मपरिवर्तन हे गंभीर आहे. त्याबाबत पोलीसांकडे पुरावे समोर आले असतील तर ते पुढे आणावेत.
जयश्रीताई पाटील यांच्या भाजपाप्रवेशावर बोलताना ते म्हणाले, त्यांना शुभेच्छा. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादांपर्यंतची कृष्णाकाठची माणसं विचाराशी पक्के होते. देशात काहीही स्थित्यंतर झाली तरी बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजारामबापू पाटील, जी डी लाड, डॉ. पतंगराव कदम, आर आर पाटील या सर्वांनी विचाराशी कास धरून काम केले. त्याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवे होते. पण आज बदलेल्या परिस्थितीत निर्णय घेतला असेल. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार यांनी फुलस्टॉप दिल्याचे सांगितले. तुमच्या भाजपा प्रवेशावर विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांचे वक्तव्य माझ्या वाचनात आले. पक्षात सध्या स्वतंत्रपणे काम सुरू आहे. बाहेर चर्चा सुरू असल्याने ते बोलले असतील.
भाजपा प्रवेशावरच्या चर्चेवर ते म्हणाले, मी इथेच आहे, २ पक्षाचा मेळावा घेतो, मुख्यमंत्र्याना वेगळ्या कामासाठी भेटलो, याचा अर्थ पक्षातंरासाठी म्हणणे चुकीचे आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, हक्काचा निधी गेल्याने विकासकामावर परिणाम होतो. याशिवाय इतर योजनांचा निधी दुसरीकडे वळविला जात असल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. आत्ताचा पक्षप्रवेश बघितला असता आघाडी धर्म म्हणून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला तो योग्य होता, असे म्हणायचे का यावर बोलताना ते म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारीवरून माझ्याबद्दल गैरसमज झाला. मला पक्षाच्या राज्यातील उमेदवारांसाठी मदत हवी होती, त्यामुळे माझी भूमिका योग्यच होती. कालपरत्वे परिस्थिती बदलत असते कोण कोठे जाईल अलीकडे नेम राहिलेला नाही.








