दोन तासांपर्यंत पोहू शकतो रोबोट मासा
सागरी रहस्यांची उकल करण्यासाठी ईटीएच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक मासा तयार केला आहे. बेले नावाच्या या माशाची लांबी 3 फूट इतकी आहे. हा समुद्रात सर्वसामान्य माशाप्रमाणेच पोहून सागरी डाटा जमवितो.
सागरी वातावरणाला कुठल्याही प्रकारचे नुकसान न पोहोचविता सहजपणे डाटा जमविता येईल अशाप्रकारे या माशाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. याच्या तोंडाच्या दिशेने कॅमेरा लावलेला आहे. सागरी पर्यावरणीय व्यवस्था जशी आहे, तशीच पाहण्याची आमची इच्छा आहे. बेलेच्या मदतीने समुद्रात होणाऱ्या हालचाली आम्ही पाहू शकतो आणि समजू शकतो असे संशोधक विद्यार्थी लियोन गुगेनहेमने सांगितले.
खऱ्या माशाप्रमाणे पोहू शकेल अशाप्रकारचा आकार बेलेला देण्यात आला आहे. हा मासा गुपचूपपणे हेरगिरी देखील करू शकतो तसेच डाटा प्राप्त करण्यासह व्हिडिओ रिकॉर्डिंग करू शकतो. गरज भासल्यास शत्रूच्या भागातील सागरी सुरुंगांचा शोध लावण्याची यात क्षमता असल्याची माहिती देण्यात आली.
बेलेच्या समोरच्या बाजूला कॅमेरा असून त्याच्या पोटात बॅटरी आणि मोटर बसविण्यात आली आहे. तसेच फिल्टर आणि पंप जोडण्यात आले असून ते सागरी डीएनए मिळविण्यास मदत करू शकतील. बेलेच्या मदतीने सागरी प्रवाळांचे अध्ययन करता येणार आहे. तसेच सागरी जीवांच्या डीएनएचा शोध लावता येऊ शकेल. कुठल्या ठिकाणी कोणते जीव राहतात याची अचूक माहिती मिळविता येणार आहे.
रोबोट माशाचा शेपटाकडचा भाग सिलिकॉनद्वारे तयार करण्यात आला आहे. पंपच्या मदतीने पोहण्यासाठी हा माशाप्रमाणे शेपूट हलवत असतो. बेले रेडिओ फ्रिक्वेंसीद्वारे कनेक्ट होऊ शकत नाही, यामुळे 2 तासांपयंत डाटा जमविल्यावर तो पाण्याबाहेर येतो. जीपीएस सिग्नलद्वारे तो समुद्रात कुठे आहे याची माहिती वैज्ञानिक मिळवू शकतात.









