तळेरे / वार्ताहर
सीड बँक व सीड बाॅल बनविण्याचा उपक्रम सुरू करणार
निसर्ग मित्र परिवार या पर्यवरणप्रेमी सामाजिक संस्थेने यावर्षी पावसाळ्यात नवीन संकल्प करून “सीड बँक” व “सीड बाॅल” बनविण्याचा अनोखा उपक्रम सुरू करणार आहे.’निसर्ग मित्र परिवार’ ही पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्था सन १९९३ पासून निसर्ग व पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवित आलेली आहे. त्यामध्ये वृक्षारोपन, वृक्ष संवर्धन, कचरा मुक्ती, व सार्वजनिक स्वच्छता इ. विविध उपक्रमांचा समावेश आहे.
मात्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर होत चाललेली वृक्षतोड व जमिनीतील खोलवर होत असलेले उत्खनन, बेसुमार केला जाणारा भूजल उपसा याचा कोकणातील निसर्गावर विपरीत परिणाम होऊन येथील पर्यावरणीय तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे तसेच भूजल पातळी देखील खूप खालावत चालल्याचे स्पष्ट जाणवत आहे. आणखी काही काळ हे असेच सुरू राहीले तर आपला निसर्ग संपन्न असा कोकण उजाड – भकास व्हायला फार वेळ लागणार नाही.खरेतर कोकणात असणारी जैविक विविधता व निसर्ग वृक्षसंपदा कालपरत्वे नष्ट होत चाललेली आहे. येथील निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन बिघडत चाललेले आहे. येथे पडणारा पाऊस व त्याचे प्रमाण अनिश्चित झालेले आहे. येथे वीजा चमकून कोसळण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. येथील हवेमधील धुलीकणांचे प्रमाण वाढून शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झालेले आहे. तसेच येथील पर्यावरणीय तापमान वाढीच्या झळा तर येथील सर्वच सजीवांना होरपळवून टाकत आहेत.









