काँग्रेस नेते राहुल गांधींचे सरकारला आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
28 मे रोजी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे. नव्या संसदेचे उद्घाटन पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी करावे असे राहुल गांधींनी म्हटले आहे. तर निश्चित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी हे नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत.
नवे संसद भवन म्हणजे पंतप्रधान मोदींचा व्हॅनिटी प्रोजेक्ट असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. नवे संसद भवन एका त्रिकोणी आकारातील चारमजली इमारतीच्या स्वरुपात तयार करण्यात आले असून ही वास्तू 64,500 चौरस मीटर क्षेत्रात फैलावलेली आहे.
विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करविण्याच्या निर्णयावर आक्षेप दर्शविला आहे. पंतप्रधान मोदी हे सरकारचे प्रमुख आहेत, संसदेचे नव्हे असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा अध्यŠ आणि राज्यसभेचे सभापती याचे उद्घाटन का करू शकत नाहीत अशी विचारणा एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
लोकसभा सचिवालयानुसार अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मागील आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेत त्यांना नव्या भवनाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी होणार आहे.
नव्या संसदेच्या लोकसभेत 888 सदस्य तर राज्यसभेत 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. वर्तमान संसद भवनात लोकसभेत 550 तर राज्यसभेत 250 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. संसदेची नवी वास्तू सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा हिस्सा असून याच्या अंतर्गत नवी दिल्लीतील देशाच्या पॉवर सेंटरचे नुतनीकरण करण्यात येत आहे. याच्या अंतर्गत केंद्रीय लोक निर्माण विभाग राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत तीन किलोमीटरच्या रस्त्याचे नुतनीकरण, केंद्रीय सचिवालयाची निर्मिती, पंतप्रधानांचे नवे कार्यालय आणि निवासस्थान, एक नवे उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह निर्माण करण्यात येत आहे.









