स्वच्छता-समस्या सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांना नूतन महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी भेट दिली. गोवावेस येथील कार्यालयामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले होते. याचबरोबर बसण्यासाठी खुर्च्यादेखील नव्हत्या. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. याचबरोबर इतर विभागीय कार्यालयात जाऊन पाहणी करून कामांमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना केली आहे. गोवावेस येथील महसूल कार्यालयामध्ये सर्वत्र कचरा पसरला होता. त्याठिकाणी नागरिकांना थांबणेदेखील अवघड झाले आहे. तेव्हा प्रथम स्वच्छता करा, अशी सूचना करण्यात आली. कोनवाळ गल्ली येथील कार्यालयालाही भेट देण्यात आली. त्याठिकाणी विविध कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विश्वेश्वरय्यानगर येथील विभागीय कार्यालयालाही भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी नूतन महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कामकाजामध्ये सुधारणा करण्याबाबत यावेळी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.









