येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक उत्साहात
वार्ताहर/येळ्ळूर
येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची तिसरी बैठक बाल शिवाजी वाचनालय येळ्ळूर येथे उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते. कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून त्यांच्याशी विचारविनिमय करुनच नवीन कार्यकारिणी निर्माण करण्याचे आहे, असे प्रास्ताविकामध्ये विलास घाडी यांनी सांगितले. जुन्या कार्यकारिणीच्या बरखास्तीनंतर नव्या कार्यकारिणाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या विचारावर चर्चा करण्यात आली.
गाव समावेशक कार्यकारिणी होण्यासाठी प्रभागानुसार ज्येष्ठ कार्यकर्ते व युवकांच्या चर्चेतून कार्यकारिणीसाठी नावे सूचवावी असा विचार पुढे आला. पण गावातील प्रभागांची विस्कळीत रचना बघता ते शक्य होणार नाही. त्या ऐवजी गल्लीनुसार नावे नोंदवण्याच्या सूचनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे कार्यकारिणी सर्वसमावेशक होऊन क्रीयाशिल कार्यकर्त्यांना संधी मिळेल.
आजच्या बैठकीला जमलेली गर्दी बघून सर्वांनी समाधान व्यक्त केले. बैठकीत मनोहर पाटील, राजू उघाडे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, लक्ष्मण छत्र्यान्नावर, माजी पंचायत समिती सदस्य रावजी पाटील यांनी आपले विचार मांडले. यावेळी तानाजी हलगेकर, गोपाळ शहापूरकर, रमेश मेणसे, मनोहर आ. पाटील, मनिषा घाडी, शालन पाटील, सोनाली येळ्ळूरकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाय. सी. इंगळे यांनी आभार मानले.









