पुणे / प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हा देशाचा आत्मा असल्याचे मत राज्याचे उच्च शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी सोमवारी व्यक्त केले.
गणेशोत्सव काळात लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघात ‘गणपती रंगवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोथरुड मधील अनेक बाल मित्रांनी सहभाग घेतला. यातील उत्कृष्ट बालकलाकारांना आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुकुल शिक्षण पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व होते. या पद्धतीमुळे आपल्या मुलांना सर्व कलांचे शिक्षण मिळत होते. मात्र, ब्रिटिशांनी ही शिक्षण पद्धती मोडीत काढली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कौशल्याभिमुख शिक्षण देणारी ही शिक्षण पद्धत आणली असून, केंद्र सरकारचे हे नवे शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा आहे. ज्यामुळे आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळण्यासह सर्वांगिण विकास होईल.
अधिक वाचा : मुंबईत भाजपा-आरपीआयला मनसेची गरज नाही
आज आपल्या पुणे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत. जी आताच्या तरुण पिढीलाही माहिती नाहीत. त्यामुळे आगामी काळात ही सर्व ठिकाणे शोधून त्यांची नवीन पीढिला ओळख व्हावी, या उद्देशाने लहान मुलांसाठी ‘मामाच्या गावाला जाऊ या!’ नावाने छोटी सहल आयोजित केली जाईल. त्याचप्रमाणे आपली नवीन पिढी संस्कारक्षम घडवी या उद्देशाने मातृवर्गासाठी ‘आईच्या गोष्टी’ ही स्पर्धा आयोजित केली जाईल,” अशी घोषणाही पाटील यांनी यावेळी केली.