चिखलाचे साम्राज्य,वाहतुक धोकादायक,एसटी वाहतूक बंद पडण्याची भीती,जनतेतून संताप
म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असलेल्या परखंदळे – गोठे ते धुंदवडे – गगनबावडा मार्गावरील गवशी (ता.राधानगरी) ते चौधरवाडी (ता.गगनबावडा) गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यावर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला आहे.मात्र माती भरावाचे काम ऐन जूनमध्ये पावसाच्या तोंडावर केले आहे.परिणामी पावसामुळे पुलावर सध्या रस्ता चिखलमय झाल्याने अपघातास निमंत्रण देणारा ठरत असून जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर एसटी बस वाहतूक बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
परखंदळे ते धुंदवडे – गगनबावडा हा धामणी खोऱ्याचे प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरील चौधरवाडी (ता गगनबावडा) ते गवशी (ता.राधानगरी) दरम्यानच्या ओढ्यावर गगनबावडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखों रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने ऐन उन्हाळ्यात एप्रिल मध्ये काम सुरू केले होते.मात्र ठेकेदाराने काम कासव गतीने सुरू ठेवले होते.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जून महिन्यात संबंधित ठेकेदाराने व अधिकाऱ्यांनी पुलाच्या भरावाच्या काम हाती घेतले.पण सदर काम घाई गडबडीत योग्यरीत्या न करता व भरावाच्या माती कामावर चांगल्या प्रकारे खडीकरण न केल्याने सध्या पावसामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात दलदल होऊन रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी गेल्या आठ दिवसापासून वाहनधारकांना या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्या अगोदर सदर मार्गावरील पूलाचे काम पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे होते. मात्र ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पुलाच्या मातीकाम भरावा टाकण्यासाठी जून महिन्याचा मुहूर्त उजाडला. जून महिन्यात पावसाने उघडी दिली असतानाही घाईगडबडीत सदर भरावाचे काम करत थोड्या प्रमाणात खडीकरण केले आहे.
मात्र गेल्या आठ दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसामुळे पुलावरील माती भरावा भिजल्याने दलदल होऊन रस्ता निसरडा बनला आहे.अशा धोकादायक बनलेल्या रस्त्यावर मोटरसायकली घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत.सध्या धुंदवडे खोरीतील वाहतूक धोकादायक सुरू आहे.तर चिखल व दलदलीचे प्रमाण वाढल्यास कोणत्या ही क्षणी या मार्गावरील कोल्हापूर व गगनबावडा दरम्यान सुरु असलेली एस.टी.बस वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देऊन या पुलावरील चिखल हटवून त्या ठिकाणी खडी टाकून रस्ता वाहतुकीसाठी चांगला करावा अशी मागणी जनतेतून होत आहे .










