स्पर्धेतील दुसरा धक्कादायक निकाल, सामनावीर एडवर्ड्सचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ धरमशाला
यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील दुसरा धक्कादायक निकाल मंगळवारी येथे पहावयास मिळाला. नेदरलँड्सने बलाढ्या दक्षिण आफ्रिकेला 38 धावांनी धूळ चारत शानदार विजय साकार केला. तीन सामन्यांतील त्यांचा हा पहिला विजय आहे तर द.आफ्रिकेचा तीन सामन्यातील पहिला पराभव आहे. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला सामनावीराचा बहुमान मिळाला. उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच त्याने 69 चेंडूत नाबाद 78 धावा जमविल्या आणि यष्टिरक्षणात तीन झेल टिपत अष्टपैलू चमक दाखविली. नेदरलँड्सने सर्वच विभागात दक्षिण आफ्रिकेपेक्षा सरस कामगिरी करीत त्यांना पराभूत केले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करीत नेदरलँडस्ने बलाढ्या दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 246 धावांचे आव्हान दिले. नेदरलँडस्च्या डावात कर्णधार एडवर्ड्सचे नाबाद अर्धशतक वैशिष्ट्या ठरले. नेदरलँडस्ने 43 षटकात 8 बाद 245 धावा जमविल्या. त्यानंतर नेदरलँड्सच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव 42.5 षटकांत 207 धावांत आटोपला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 43 षटकांचा खेळविण्यात आला. डेव्हिड मिलर (52 चेंडूत 43) व केशव महाराज (37 चेंडूत 40) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना तिशीही ओलांडता आली नाही. कर्णधार टेम्बा बवुमाने 16, क्विटन डी कॉकने 20, हेन्रिच क्लासेनने 28, गेराल्ड कोएत्झीने 22 धावा जमविल्या. केशव महाराज व एन्गिडी यांनी शेवटच्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. द.आफ्रिकेच्या डावातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. नेदरलँड्सच्या लोगन व्हान बीकने 3, पॉल व्हान मीकेरेन, रोलफ व्हान डर मेर्वे, बास डी लीडे यांनी प्रत्येकी 2 व अॅकरमनने एक बळी मिळविला.
नेदरलँड्सची खराब सुरुवात
धरमशालामध्ये मंगळवारी सकाळी ढगाळ हवामान आणि पाऊस झाल्याने हा सामना तासभर उशिरा खेळविला गेला. पंचांनी हा सामना प्रत्येकी 43 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे नेदरलँड्सला फलंदाजीचे निमंत्रण दिले. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज रबाडा, एन्गीडी, जेनसन यांनी या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. विक्रमजीत सिंग आणि ओदाऊद यांनी पहिल्या 37 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. रबाडाने सातव्या षटकात विक्रमजीत सिंगला क्लासेनकरवी झेलबाद केले. त्याने केवळ 2 धावा जमविल्या. त्यानंतर नेदरलँडस्चे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 9 षटकात नेदरलँडस्ने 28 धावा जमविताना 2 गडी गमवले. नेदरलँड्सचे पहिले अर्धशतक 79 चेंडूत तर शतक 142 चेंडूत फलकावर लागले. जॅन्सेनने दाऊदला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 18 धावा जमविल्या. डी लीडे रबडाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 2 धावा जमविल्या. कोएत्झीने अॅकरमनचा त्रिफळा उडविला. त्याने 1 चौकारासह 12 धावा केल्या. नेदरलँडस्ची यावेळी स्थिती 15.1 षटकात 4 बाद 50 अशी होती. इंग्लेब्रेटने 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 तर निडेमनुरूने 3 चौकारांसह 20 धावा जमविताना या जोडीने पाचव्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी केली.
नेदरलँडस्चा निम्मा संघ 21 व्या षटकात 82 धावात तंबूत परतल्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने कप्तानी खेळी करत 69 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 78 धावा जमविल्या. त्याने व्हान डर मेर्व्हे समवेत आठव्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केल्याने नेदरलँड्सला 245 धावांपर्यंत मजल मारता आली. मेर्व्हेने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. एडवर्ड्सने आर्यन दत्तसमवेत नवव्या गड्यासाठी अभेद्य 41 धावांची भागीदारी केली. दत्तने 9 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 23 धावा फटकावल्या. नेदरलँडस्ला अवांतराच्या रुपात 32 धावा मिळाल्या. त्यामध्ये 21 वाईड, 1 नोबॉल आणि 10 लेगबाईजचा समावेश आहे. नेदरलँडस्ने शेवटच्या 5 षटकात 68 धावा झोडपल्या. नेदरलँडस्चे दीडशतक 209 चेंडूत तर द्विशतक 237 चेंडूत फलकावर लागले. नेदरलँडस्च्या डावात 6 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा, एन्गीडी आणि जॅन्सेन यांनी प्रत्येकी 2 तर कोएत्झी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : नेदरलँडस् 43 षटकात 8 बाद 245 (एडवर्ड्स 69 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 78, आर्यन दत्त 9 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 23, व्हान डर मेर्व्हे 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29, अवांतर 32, एन्गीडी, जॅन्सेन, रबाडा प्रत्येकी 2 बळी, कोएत्झी, केशव महाराज प्रत्येकी 1 बळी).
द.आफ्रिका 42.5 षटकांत सर्व बाद 207 : मिलर 52 चेंडूत 43, केशव महाराज 37 चेंडूत 40, क्लासेन 28 चेंडूत 28, कोएत्झी 23 चेंडूत 22, डी कॉक 22 चेंडूत 20, बवुमा 31 चेंडूत 16, व्हान बीक 3-60, मीकेरेन 2-40, व्हान डर मेर्वे 2-34, डी लीडे 2-36, अॅकरमन 1-16.









