खासदार मंगला अंगडी यांचे प्रतिपादन, दसरा विभागीय क्रीडा स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
खेळाडूंनी लहानपणापासूनच अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे. सध्याचे युवक हे व्यसनाधीन झाले असून मोबाईलला खिळून राहिले आहेत. यामुळे त्यांची प्रगती थांबली असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी खेळ हाच एक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या तांत्रिक युगात खेळाकडेही लक्ष देवून आपले शरीर बळकट व सदृढ बनविणे गरजेचे आहे. कारण व्यायाम व इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खचली आहे आणि मानसिक स्थिती बळकट करवण्यासाठी खेळासारखे दुसरे साधन नाही. भारतामध्ये आता खेळाकडे जास्त लक्ष दिले जात आहे. नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया व इतर खेळांच्याकडे जास्त लक्ष केंद्रीत केल्यामुळे भविष्यात भारतही खेळातील प्रगत देश बनल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तळागाळातील विद्यार्थ्यांनी खेळात भाग घेऊन नवीन उपक्रमांचा फायदा उठवावा, असे प्रतिपादन खासदार मंगला अंगडी यांनी केले.
जिल्हा क्रीडांगणावर युवजन क्रीडा खाते व महिला सबलीकरण आयोजित म्हैसूर दसरा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी युवजन क्रीडा अधिकारी जिनेश्वर पडनाड यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. राष्ट्रीय ज्युडो खेळाडू वसुंधरा, भाग्यश्री, अक्षता, सबुक्ष यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केल्यानंतर हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रिती अजुर हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, बसवराज होसमठ, संजीव नाईक, व्ही. एस. पाटील, नामदेव मिरजकर, नागराज केआरके, हणमंत पाटील, सदानंद मालशेट्टी, रोहिणी पाटील, ऋतुजा मुलतानी आदि प्रशिक्षक उपस्थित होते. या विभागीय क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग, ज्युडो, जिम्नॅस्टिक, जलतरण, व्हॉलिबॉल, कबड्डी, टीटी, टेनिस, बास्केटबॉल, कुस्ती आदी खेळांचा समावेश आहे. बुधवारी सांघिक खेळ घेतले जाणार आहेत. सूत्रसंचालन मंगला मगदुम यांनी केले.









