वाढत्या अमलीपदार्थांमुळे सुशिक्षित मुलेही होतायेत बरबाद : पोलिसांनी घटना गांभीर्यानी घेण्याची जनतेची मागणी
पणजी : चोरून, छुप्या पद्धतीने मिळणारा अमलीपदार्थ आता राज्यातील प्रमुख शहरांतही सहज मिळू लागल्याने अनेक कुटुंबीयांना चिंता सतावू लागली आहे. कारण हल्लीच राजधानी पणजी परिसरातील कांपाल या ठिकाणी अल्पवयीन मुलांनी कशाचेतरी व्यसन करून एका अल्पवयीन मुलाला केलेली मारहाणीची घटना पुढे आली. या घटनेमुळे अनेक कुटुंबे हादरली आहेत. पोलिसांकडून ही केवळ मारहाणीची घटना आहे, असे ठासून सांगितले असले तरी प्रत्यक्षात या मुलांनी गांजाचे सेवन केले होते, असे काही सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातूनच हा नशेतून मारहाणीचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
जर खरोखरच पणजीसारख्या परिसरात गांजा किंवा अमलीपदार्थ बाळगणारे वावरत असतील तर ज्या पद्धतीने माजी महापौर उदय मडकईकर यांच्या पुढाकाराने पोलिसांनी केलेल्या कारवाईची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होण्याची गरज आहे. 2020 मध्ये माजी महापौर उदय मडकईकर यांना पणजी परिसरात गांजा बाळगणे व विक्री होत असल्याचा सुगावा लागताच त्यांनी आपल्या एका जवळच्या मित्राकरवी मध्यरात्रीच्या सुमारास गिऱ्हाईक बनून गांजा खरेदी केला होता. सर्व पुरावे हाती लागताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती देऊन कारवाईबाबत गुप्तता पाळली. त्यानंतर पोलीस व महापालिकेतर्फे धडक कारवाई करून हा प्रकार उघडकीस आणला होता. यानंतर काही वर्षे गांजा किंवा इतर अमलीपदार्थ बाळगण्याचे धाडस कुणाला झाले नव्हते. परंतु आता गांजा सापडण्याच्या घटना घडत असून, तो मिळत असल्याचेही बोलले जात आहे. यावर नियंत्रण येण्याबरोबरच ही नशा वाढवणारी यंत्रणाच मुळासकट उपटून काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कडक कारवाई व्हायलाच हवी
शाळा, मंदिर परिसरातही अमलीपदार्थाच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सध्याही अशा ठिकाणी हे अमलीपदार्थ सापडतात परंतु आम्ही कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कारण यातून एखाद्या शिक्षण संस्थेचे नावही खराब होण्याचा धोका असतो. म्हणून पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी जर कुणी अमलीपदार्थांची विक्री करण्यात गुंतले असतील तर त्यांच्यावर कारवाई ही कडक स्वऊपाची व्हायला हवी. कारण पालक व शिक्षक हे मुलांवर उत्तम संस्कार करण्याबरोबच त्यांना वाममार्गापासून रोखतात. तरीही जर हे व्यसन मुलांपर्यंत पोहोचत असेल तर त्याला पोलीस यंत्रणेनेच जरब घालण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जावे
सरकारी पातळीवर राज्याला ड्रग्जमुक्त करण्याची मोहीम आखली जात असली तरी आज शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली ही अमलीपदार्थाची नशा भावी पिढीला बरबाद करणारी आहे. कांपाल येथे गांजा दिला नाही म्हणून घडलेली मारहाणीची घटना भयावह आहे. पणजी पोलिसांनी जरी खुनाचा गुन्हा नोंदवला असला तरी पोलीस खात्याने घटनेच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. कारण या घटनेमुळे राज्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र स्पष्ट होऊन ही चिंतेची बाब ठरली आहे.
नशा केलेली मुले सुशिक्षित
कांपाल मैदानावर एका अल्पवयीन मुलाला केलेल्या मारहाण घटनेतील संशयित तीन मुले सुशिक्षित आहेत. त्यातील एक मुलगा हा गोवा तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. ही तिन्ही मुले पणजीस्थित तर जखमी मुलगा परप्रांतीय आहे, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या घटनेतील संशयित तिन्ही मुलांना मेरशी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
आताही कडक कारवाई करायला हवी : मडकईकर
कांपाल येथे गांजाची नशा करून अल्पवयीन मुलांमध्ये झालेला मारहाणीचा प्रकार समजताच धक्का बसला. कारण मी 2020 साली महापौर असताना अमलीपदार्थाची विक्री पणजी परिसरात होत असल्याचे माझ्या कानी आले होते. सत्यता जाणून घेण्यासाठी मित्राकरवी या घटनेच्या मुळाशी जाण्याचा मी प्रयत्न केला. कांपाल परेड ग्राऊंडवर विकासकामासाठी पाईपलाईन ठेवण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी रात्रीच्यावेळी अमलीपदार्थाची विक्री होत असल्याचे आम्हाला आढळून आले. त्यात अडकलेल्या व्यक्ती त्या ठिकाणी झोपड्या उभारून आपले काम करीत होत्या. याबाबत ठोस पुरावे हाती लागताच आम्ही धडक कारवाई करून लोकांचा विरोध असतानाही त्या झोपड्याही हटवल्या होत्या. त्यामुळे अशाच स्वऊपाची कारवाई आता पुन्हा एकदा होणे गरजेचे आहे.
– उदय मडकईकर, माजी महापौर
भावी पिढी ही वाममार्गाला लागण्याची शक्यता
एनडीपीएस न्यायालयात अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्याविऊद्धच्या तक्रारी नोंद असतात. अमलीपदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्यांवर कठोर कारवाई होऊ शकते. पणजी व म्हापसा या ठिकाणच्या न्यायालयात अशाप्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असतात. यामध्ये 1 ते 20 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय 1 लाख ऊपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे. परंतु प्रत्यक्षात अमलीपदार्थ किती प्रमाणात सापडला, यावर ज्या-त्या पद्धतीने गुह्याची शिक्षा दिली जाते. राज्यात अमलीपदार्थ फोफावला आहे, ही वस्तुस्थिती आहे. याला जर मुळापासून उखडून काढायचे झाल्यास प्रत्यक्षात कठोर कारवाईची गरज आहे. पोलीस प्रशासनाने तसा ठाम निश्चय करणे गरजेचे आहे, अन्यथा भावी पिढी ही वाममार्गाला लागून राज्याचे किंबहुना देशाचेच अतोनात नुकसान होणार आहे.
– अॅड. डी. एल. पुसेकर









