मंत्री रमेश तवडकर यांचे प्रतिपादन: श्रमधाम योजनेंतर्गत 30 लाभार्थ्यांना घरे प्रदान
प्रतिनिधी/ पणजी
एकेकाळी गोवा हे माणुसकीचे माहेरघर होते. संपूर्ण गाव म्हणजे एका कुटुंबाप्रमाणे लोक वागत होते. त्याकाळी धन मोजण्यापेक्षा परिवार, माणसे मोजणे महत्त्वाचे मानले जायचे. आज माणुसकीच लोप पावत चालली आहे, लोक आपले संस्कार, संस्कृती विसरत चालले आहेत. अशावेळी गावचे गावपण आणि माणुसकी सांभाळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मंत्री रमेश तवडकर यांनी केले.
काणकोण येथील बलराम धर्मदाय संस्थेतर्फे पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘श्रमधाम’ योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील गरीब गरजूंना मोफत घरे बांधून देण्यात आली असून अशा एकूण 30 लाभधारकांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर यावेळी केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याशिवाय आमदार दाजी साळकर, प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, प्रभाकर गांवकर, सरपंच सविता तवडकर, मडगांवचे नगरसेवक दामोदर शिरोडकर आणि कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना तवडकर यांनी, या योजनेखाली आतापर्यंत 70 घरे बांधून देण्यात आली असून हा चमत्कार माझ्या कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले. हा उपक्रम आता केवळ काणकोण पुरताच मर्यादित राहिलेला नसून सांगे, केपे, प्रियोळ, धारबांदोडा आणि आता पेडणेपर्यंत पोहोचला आहे. त्याही पुढे जाताना आम्ही केरळ राज्यातील वायनाड सारख्या भागात पूरग्रस्त कुटुंबीयांनाही मदतीचा हात म्हणून काही घरे बांधून देण्यात आली असल्याचे तवडकर यांनी सांगितले.
याकामी आम्ही केवळ निमित्तमात्र असून या उपक्रमाला ‘श्रमधाम’ असे नाव देण्यात आले असले तरी तो समाजसेवेचा एक ‘सत्संग’ आहे, असे ते म्हणाले. सत्य व प्रमाणिक भावनेने केलेल्या कार्याची देवसुद्धा दखल घेतो. म्हणूनच आमच्या या कार्यात शेकडो हात स्वच्छेने, स्वयंस्फूर्तीने आणि उत्स्फूर्ततेने वावरत आहेत. या वॉरियर्स शिवाय असंख्य दाते विविध साहित्य दान करून या सत्संगात योगदान देत आहेत. म्हणूनच हा यज्ञ आम्ही अखंड पेटवत ठेऊ शकलो आहोत.
याच कार्यकर्त्यांच्या बळावर आता पुढील तीन महिन्यात 100 घरे बांधून देण्याचा एक नवीन संकल्प आम्ही केला आहे. त्यानुसार 1 घर 100 कार्यकर्ते अशी कार्यशक्ती वापरण्यात येणार असून 10 घरांसाठी 10 हजार कार्यकर्ते वावरणार आहेत. हा संकल्प सत्यात आल्यास देशात अशाप्रकारचा तो पहिलाच उपक्रम व एक विक्रम ठरणार आहे, असे ते म्हणाले.
माणसाने जीवनात किती पैसा कमावला याची मोजणी करण्यापेक्षा किती माणसे जोडली त्याचा हिशेब करावा. आपले कार्य सज्जनतेने करावे, त्यायोगे आपल्या मुलांनाही आदर्श पालकांची मुले म्हणून ओळख मिळावी, तरच आपले जीवन फलदायी ठरले व सार्थकी लागले, असे म्हणता येईल, असे तवडकर यांनी शेवटी सांगितले.
तवडकर यांचे कार्य देशासाठी आदर्शवत : उईके
केंद्रीय मंत्री उईके यांनी बोलताना, ज्या परिवारात एकता असते तो विकसित होतो, असे सांगितले. तवडकर यांनी चालविलेल्या महान कार्याची प्रत्येक राज्य आणि राजकीय व्यक्तींनी दखल घ्यावी, स्वत:साठी तो एक आदर्श मानून त्यांच्या पावलावर चालण्याचे प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. मृत्यू हा अटळ असतो हे अंतिम सत्य असले तरी मृत्यूनंतरही अमर राहायचे असेल तर प्रत्येकाने एक तरी आदर्श काम करावे, असेही ते म्हणाले.
घरे बांधता बांधता हजारो कुटुंबे जोडली : साळकर
दाजी साळकर यांनी बोलताना, मंत्री तवडकर यांनी चालविलेले कार्य हा एक यज्ञ असून त्यात श्रमदानाच्या काही समिधा टाकण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण स्वत:ला भाग्यवान समजतो, असे भावनिक उद्गार काढले. आज जेथे माणुसकीच हरवत चालली आहे तेथे तवडकर यांनी चालविलेले कार्य दुर्मीळ असून घरे बांधता बांधता त्यांनी हजारो कुटुंबे जोडली आहेत, असे ते म्हणाले.
प्रेमेंद्र शेट यांनी बोलताना, स्वार्थ हा आमच्या जीवनातील मोठा शत्रू आहे. स्वार्थामुळेच भाऊ भावाला ओळखत नाही, असे चित्र अनेक कुटुंबांमध्ये दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाने समाधानी राहण्याचे प्रयत्न करावे, कारण समाधान हे मानण्यावर अवलंबून असते. त्याचबरोबर मनात त्यागाची भावना असावी. त्यातून प्रत्येकाचे जीवन आनंदी बनण्यास मदत होईल. श्री. तवडकर यांच्या कार्यातून हे सिद्ध होत आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमासाठी खचाखच भरलेल्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात उपस्थितांचे सविता तवडकर यांनी स्वागत केले. त्या दरम्यान त्यांनी बलराम ट्रस्ट आणि श्रमधाम योजनेच्या कार्याचा आढावा घेतला. पेडणे येथील संगीत चमूतर्फे कृष्णा पालयेकर लिखित विशेष स्वागतगीत सादर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातील मुलांनी अनुक्रमे ‘आधार’ आणि ‘श्रमधाम-घर का सपना’ ही पथनाट्यो सादर केली. श्रद्धा गवंडी आणि श्रद्धा नाईक यांनी एकपात्री प्रयोग सादर केले.
श्रमधाम उपक्रमासाठी सढळ हस्ते मदत, सहकार्य करणाऱ्या केशव प्रभू, प्रशांत पागी, संजय सातार्डेकर, संगम कुराडे, नवल नाईक आणि रवींद्र ऊनावत या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर श्रमधाम योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या 30 लाभधारकांना चाव्या प्रदान करण्यात आल्या. डॉ. गोविंद भगत यांनी मनोवेधक सूत्रसंचालनाद्वारे उपस्थितांची मने जिंकली.









