केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन : जी 20 परिषदेच्या आरोग्य कृतीगट बैठकीचा समारोप
पणजी : आरोग्याविषयी भीती आणि दुर्लक्ष अशा दोन्ही गोष्टींचे दुष्टचक्र भेदणे ही आपली सामुहिक जबाबदारी असून महामारीशी सामना करतांना आलेला थकवा, आपल्या पुढील सज्जतेसाठी तसेच प्रतिबंध आणि प्रतिसादाच्या लढाईसाठी अडथळा ठरता कामा नये, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले. राज्यात सुऊ असलेल्या जी-20 आरोग्य कृतीगट बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, जी20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, विशेष आमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था, मंच आणि जागतिक आरोग्य संघटना, यांचे प्रतिनिधी तसेच अन्य भागिदार आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
सकारात्मक प्रभाव निर्माणाची वाटचाल
आपल्या या भाषणात पुढे बोलताना डॉ. मांडवीय यांनी, ’जी-20 आरोग्य कृतीगट म्हणून आम्ही भविष्यातील जागतिक आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि व्यवस्था यांच्यासाठी संयुक्तपणे सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत’, असे सांगितले. यावेळी त्यांनी जी-20 सदस्य देशांतील आमंत्रित केलेल्या सर्व प्रतिनिधींचे कौतुक केले. भारताने प्रस्तावित केलेल्या आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांशी अन्य सदस्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपापले प्राधान्यक्रम सुसंगत केल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
समन्वय यंत्रणेची आवश्यकता
जगभरातील आरोग्यव्यवस्थेवर कोविडचा झालेला परिणाम अधोरेखित करताना डॉ. मांडवीय यांनी, वैद्यकीय प्रतिकार विषयक उपाययोजनांसाठी औपचारिक स्वरूपाच्या जागतिक समन्वय यंत्रणेची गरज असल्याचे अधोरेखित केले. तसेच या आणि वैद्यकीय प्रतिकारविषयक अजेंड्यावर एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगितले. आरोग्य सेवा वितरणामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, जगभरातील डिजिटल तफावत कमी करणे आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंना प्रोत्साहन देणे, यासाठी डिजिटल आरोग्य आणि नवोन्मेष विषयक अजेंडा मांडण्यात आल्याचे सांगितले.
दर्जेदार आरोग्यसेवा प्रणालीची गरज : डॉ. पवार
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही या सत्रात विचार मांडले, भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा आधार ’वसुधैव कुटुंबकम्’ या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये असल्याचे त्या म्हणाल्या. सर्वांना परवडणाऱ्या दरात आणि समान उपलब्धता तसेच अधिकार आणि आणि देशांच्या सीमा ओलांडून लोकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा प्रणाली तयार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ‘एक आरोग्य’ या दृष्टिकोनातून आणि प्रतिजैविके प्रतिकाराच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकात्मिक जागतिक आरोग्य आराखड्याची गरज अधोरेखित केली. सर्वांसाठी ‘सार्वत्रिक आरोग्य सेवा-सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी सर्वांनी चर्चा सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.