पुणे / प्रतिनिधी :
आमचीच राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद अधिकृत असून, भविष्यात आम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. तसेच परिषदेद्वारे महिला व कुमार गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत, असेही सांगितले. शरद पवार यांच्या सक्रिय भूमिकेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्वसाधारण सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडली. या सभेला राज्यभरातील 45 संघटनांमधून 90 पैकी 80 सदस्य सहभागी झाले होते. या बैठकीला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी असे एकूण 45 संघांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते.
राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला न्यायालयानी स्थगिती दिली. त्याच दरम्यान महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा देखील घेण्यात आली होती.
नेमका वाद काय?
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय बृजभुषण सिंग अध्यक्ष असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने घेतला. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली नवीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्तित्त्वात आली. या परिषदेकडून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. मात्र बाळासाहेब लांडगे यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयाला न्यायालयात आवाहन दिले.
न्यायालयाने बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीला स्थगिती दिलीय. त्यामुळे बाळासाहेब लांडगे आणि शरद पवार गटाकडून राज्यातील सर्व जिल्हा कुस्तीगीर संघांना बैठकीसाठी बोलावण्यात आले.
आंदोलक कुस्तीपटूंना शरद पवारांचा पाठिंबा
लैंगिक शोषणप्रकरणी न्यायासाठी गेले महिनाभर आंदोलन करत असलेल्या महिला कुस्तीपटूंना पाठिंबा असल्याचेही यावेळी पवार यांनी जाहीर केले.