लोकसभेची तयारी : नितीशकुमारांच्या पवित्र्याला लालूंचे समर्थन असल्याची चर्चा
वृत्तसंस्था/ पाटणा
दिल्लीत नितीशकुमार जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होत असताना त्याच कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जेडीयूच्या काही उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केल्याचे समजते. यामध्ये सीतामढीमधून देवेशचंद्र ठाकूर यांची उमेदवारी मंजूर करण्यात आली, तर मुंगेरमधून राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग आणि दरभंगामधून मंत्री संजय झा यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. यासोबतच हे सर्व नितीशकुमार आणि लालू यादव यांच्या परस्पर संमतीने घडत असल्याची चर्चा असून त्याचा ‘इंडिया’ आघाडीतील इतर पक्षांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीतामढीतून उमेदवारी मिळाल्यानंतर देवेशचंद्र ठाकूर यांनी नितीशजी आणि लालूजींशी आपल्या उमेदवारीबाबत आधीच चर्चा केल्याचे स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांच्या आशीर्वादानंतरच आपण तयारी सुरू केली. दुसरीकडे, लालन सिंह मुंगेरमधून लोकसभा निवडणूक लढवतील यात शंका नाही, कारण त्यांनी निवडणुकीचा हवाला देत जेडीयू अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचेही सांगण्यात आले. दरभंगामधून जेडीयूने येथून संजय झा यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. मात्र, या जागेवर राजदने संमती दिली आहे की नाही, याबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. किंबहुना, येथून आरजेडीचे अब्दुल बारी सिद्दीकी यांनी दावा केल्याचीही चर्चा रंगली आहे. याचाच अर्थ तीन जागांवर जेडीयूच्या उमेदवारीवर संशय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता जेडीयूचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असून त्यामध्ये कोणत्याही जागेवर आरजेडी आणि जेडीयूमध्ये मतभेद होण्याची शक्मयता नाही. मात्र, ‘इंडिया’ आघाडीची बैठक न घेता उमेदवारांची नावे निश्चित होत असल्यामुळे आता काँग्रेससह इतर पक्षही दबावतंत्र वापरणार असल्याची चर्चा आहे.









