कौन्सिल विभागाकडून कार्यवाही
बेळगाव : महापौर मंगेश पवार हे अपात्र ठरल्याने कौन्सिल विभागाकडून महापौर कक्षाबाहेरील त्यांचा नाम फलक सोमवारी पांढऱ्या कापडाने झाकण्यात आला. त्यामुळे महापालिकेत नगरसेवक अपात्रतेच्या प्रकरणाची चर्चा सुरू होती. तसेच सोमवारी मंगेश पवार महापालिकेकडे फिरकले नाहीत. खाऊ कट्ट्यातील गाळे मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी आपल्या पत्नींच्या नावे घेतले होते. मनपाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी सदर गाळे घेतले असले तरी ते नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते मनपाला परत करणे गरजेचे होते. मात्र, दोघांनीही आपल्या पत्नींच्या नावे गाळे ठेवून मनपाचा अप्रत्यक्ष फायदा घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला.
सुजित मुळगुंद यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक नितीन जाधव यांना अपात्र ठरविले. प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाविरोधात त्यांनी नगर विकास खात्याकडे दाद मागितली होती. त्या खात्याच्या सचिव दीपा चोळण यांनी बेळगाव प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत दोघांचे अर्ज फेटाळले. त्यामुळे महापौर पवार आणि नगरसेवक जाधव पुन्हा अपात्र ठरले. या विरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी कौन्सिल विभागाकडून महापौर कक्षाबाहेर लावलेला मंगेश पवार यांचा नाम फलक काढण्याऐवजी त्यावर कापड झाकण्यात यावे, असे सांगण्यात आल्याने त्यावर पांढरे कपड झाकण्यात आले आहे.









