विधानसभेत प्रस्ताव संमत : ‘केरलम’ असे नाव असणार
► वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ विधानसभेने राज्याचे नाव अधिकृत स्वरुपात बदलून ‘केरलम’ करण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा प्रस्ताव बुधवारी संमत केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सादर केला, ज्यात केंद्र सरकारला भारताच्या घटनेच्या 8 व्या अनुसूचीत सामील सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव बदलून ‘केरलम’ करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या प्रस्तावाला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची आघाडी युडीएफने कुठल्याही बदलाशिवाय समर्थन दिले. यानंतर विधानसभा अध्यक्ष ए. एन. शमसीर यांनी हात उंचावून देण्यात आलेल्या समर्थनाच्या आधारावर विधानसभेत हा प्रस्ताव एकमताने संमत झाल्याचे घोषित केले आहे.
राज्याला मल्याळी भाषेत ‘केरलम’ म्हटले जाते, परंतु अन्य भाषांमध्ये अद्याप हे केरळ असेच नाव आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासूनच मल्याळी भाषिक समुदायांसाठी एकजूट केरळ निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली होती. घटनेच्या पहिल्या अनुसूचीत आमच्या राज्याचे नाव केरळ असे नमूद आहे. ही विधानसभा केंद्र सरकारला सर्वसंमतीने विनंती करते की, घटनेच्या कलम 3 अंतर्गत यात दुरुस्ती करत ‘केरलम’ करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यात यावे आणि घटनेच्या 8 व्या अनुसूचीत उल्लेख असलेल्या सर्व भाषांमध्ये याचे नाव बदलून केरलम करावे असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सभागृहाला संबोधित करताना म्हटले.









