गिरीश चोडणकर यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
प्रतिनिधी/ पणजी
पर्वरीतील साल्वादोर द मुन्द येथील जमीन बळकाव प्रकरणात हात असलेल्या मंत्र्याचे नाव उघड करून त्याला बडतर्फ करावे, असे आव्हान गिरीश चोडणकर यांनी दिले आहे. त्याचबरोबर एसआयटीने मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी न पडता जमीन घोटाळ्यात गुंतलेल्या राजकारण्यांची नावे जाहीर करावी, असे चोडणकर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री चौकशी करण्यास तयार नसतील तर आपण स्वतः एसआयटी आणि स्थानिक पंचायतीत तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या बेकायदा जमीन बळकाव प्रकरणाची चौकशी करून सदर मास्टरमाईंड मंत्र्याचा शोध घेण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. या जमिनीची पॉवर ऑफ ऍटर्नी असलेले सेल्स फर्नांडीस यांनी या संदर्भात दि. 20 जुलै 2022 रोजी पर्वरी पोलीस, दक्षता विभाग आणि पंचायतीतही तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु आजपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आलेली नाही किंवा त्या एसआयटीकडेही देण्यात आलेल्या नाहीत, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
राज्यात गाजणाऱया जमीन बळकाव प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी हा मुख्यमंत्र्यांचा केवळ स्टंट आहे. प्रत्यक्षात आतून मुख्यमंत्रीच संबंधित राजकारण्यांना संरक्षण देत आहे, असा दावा चोडणकर यांनी केला आहे. तसे नसेल तर जमीन बळकाव प्रकरणांत सहभागी राजकीय व्यक्तींची नावें त्वरित जाहीर करण्याचे धाडस त्यांनी दाखवावे, मागणी चोडणकर यांनी केली आहे.









