अन्य शक्यतांचीही पडताळणी
बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगा येथील महिलेच्या खून प्रकरणी कोणतेच धागेदोरे सापडले नाहीत. प्रथमदर्शनी दागिन्यांसाठी खून असे या प्रकरणाचे स्वरूप असले तरी अन्य शक्यताही पडताळून पाहण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अंजना अजित दड्डीकर (वय 52) यांचा गणेश रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर मृतदेह आढळून आला होता. खून झालेल्या अंजनाची मुलगी अक्षता पाटील, राहणार शाहूनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. मंगळवारी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे. खुनानंतर अंजना यांच्या अंगावरील दागिने पळविण्यात आले आहेत. दागिन्यांसाठी खून झाला आहे की इतर कोणत्या कारणासाठी? याची पडताळणी करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही पोलिसांनी हाती घेतले असून बुधवारी रात्रीपर्यंत यासंबंधी कोणतेच धागेदोरे हाती आले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.









