जगात अशी अनेक स्थाने आहेत, की ज्यांचा शोध अकस्मात लागला आहे. शोध लागण्यापूर्वी ही स्थाने कोणालाही ज्ञात नव्हती. तसेच असे काही स्थान असू शकेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. कोणीतही काहीतरी करायला गेले आणि अशा स्थानांचा शोध लागून इतिहासातील अनेक रहस्ये उलगडली गेली आहेत. अलिकडच्या काळात काही तरुणांनी असे गट निर्माण केले आहेत, की जे अशी अद्भूत स्थाने शोधण्याचा प्रयत्न करतात. हा जणू त्यांचा व्यवसायच बनला आहे.
ब्रिटनमध्ये असा एक गट आहे. त्याने प्राचीन गुहांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या गुहा किंवा भुयारांना आजवर कोणी धुंडाळण्याचा प्रयत्न केलेला नाही, अशांचा शोध हा गट घेतो आणि त्यांच्यात दडलेल्या रहस्यांना सर्वांसामोर आणतो. काही दिवसांपूर्वीच या गटाने एका गुहेतील अशा जगाचा शोध लावला आहे, की जे आजवर कोणालाही माहीत नव्हते. ही गुहा शेकडो वर्षांपासून बंद होती.
भटकंती करत असताना या गटातील काही सदस्यांना या गुहेचा शोध लागला. या गुहेचे प्रवेशद्वार बंद होते. ते उघडले तरी, आत जाण्यात बराच धोका होता. या तरुणांनी शक्य तितकी सुरक्षासाधने स्वत:समवेत घेऊन धाडसाने या गुहेत प्रवेश केला. आतील दृष्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या गुहेत एक अख्खे घर होते. या घरात फ्रीझसह अनेक नित्योपयोगी वस्तू होत्या. घरात उपयोगाला येणारे सर्व सामान त्यात होते. इतकेच नव्हे, तर पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनही होती. शयसकक्ष होते. जणूकाही एक कुटुंब येथे रहात होते, असे वातावरण होते. फ्रीजमध्ये अनेक वस्तू होत्या, पण त्या उपयोग करण्याच्या स्थितीत नव्हत्या. आणखी शोध घेतला असता, या घरातून खोलवर जाणारी अनेक भुयारे त्यांना आढळली. त्यांच्यातील अनेक पाण्याने भरलेली होती. आता या गुहेचा आणखी शोध घेतला जात आहे. हे घर नेमके कोणाचे आणि अशा निर्मनुष्य स्थानी का बांधले, तसेच ते सोडले केव्हा आणि का, याचाही शोध घेतला जात आहे. ही गुहा आता संशोधकांसाठी एक संधी बनली आहे. या गुहेच्या आसपासच्या स्थानांचाही आता शोध घेतला जात असून येथे मानववस्ती होती का हे शोधले जात आहे. गुहेतील घरात सापडलेल्या वस्तू लक्षात घेता हे घर प्राचीन नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तर त्याचे गूढ आणखी वाढले आहे, अशी संशोधकांची भावना आहे.









