आज पृथ्वीवर जी मानव प्रजाती आहे ती ‘होमो सॅपियन’, अर्थात शहाणा मनुष्य या संज्ञेने परिचित आहे. ही एकच मानव प्रजाती आता आहे. याचाच अर्थ असा की आज पृथ्वीवर जी माणसे आहेत, ती या एकाच प्रजातीची आहेत. तथापि, साधारणत: दीड लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर होमो सॅपियनसह होमो निएंडरथल, होम इरेक्टस आणि इतर प्रकारच्या मानव प्रजाती एकाच वेळी नांदत होत्या, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. यांपैकी होमो सॅपियन वगळता इतर लुप्त झाल्या.
मानववंश शास्त्रज्ञ आज या लुप्त झालेल्या मानव प्रजातींची वैशिष्ट्यो, जीवनपद्धती, आजचा मानव आणि त्यांच्यात कोणता फरक आहे इत्यादी बाबींवर संशोधन करीत आहेत. प्राचीन काळच्या विविध मानव प्रजातींपैकी अनेकांचे अवषेश शोधून त्यांच्यावरुन हा अभ्यास होत आहे. 30 वर्षांपूर्वी इटलीतील एका स्थानी होमो निएंडरथल प्रजातीच्या माणसाचा एक संपूर्ण अस्थिपंजर अवषेश आढळला होता. त्यावेळी हा शोध आचंबित करणारा वाटला होता. तसेच या अस्थिपंजराच्या अभ्यासानंतर मानवाच्या उत्क्रांतीसंबंधीच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळून मानवाच्या ज्ञानात भर पडेल अशी अपेक्षा होती.
तथापि, आज 30 वर्षांनंतरही या निएंडरथल माणसाचे रहस्य अनुत्तरीतच आहे. याचे कारण, हा अस्थिपंजर ज्या एका मोठ्या खडकात आढळला आहे, तो खडक फोडून हा अस्थिपंजर कुठलीही मोडतोड न होता जशाचा तसा बाहेर कसा काढायचा हे संशोधकांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे केवळ रडारच्या भूमीछेद करणाऱ्या रडारच्या माध्यमातून याचा अभ्यास केला जात आहे. घाईगडबडीने हा अस्थिपंजर काढण्याचा प्रयत्न केल्यास आणि त्या प्रयत्नात या अस्थिपंजराला धोका पोहचल्यास एक महत्वाच्या ऐतिहासिक ठेवा नाहीसा होईल. किंवा निरुपयोगी होईल, अशी चिंता संशोधकांना वाटते. म्हणून ते हा अस्थिपंजर सुरक्षितपणे बाहेर कसा काढता येईल, यावर आजही काथ्याकूट करीतच आहेत.









