5 ते 14 जानेवारीदरम्यान आयोजन : देशभरातील पदार्थांची चव चाखता येणार
बेळगाव : देशभरातील खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी बेळगावकरांना जानेवारी महिन्यात उपलब्ध होणार आहे. 5 ते 14 जानेवारीदरम्यान बेळगावच्या सीपीएड मैदानावर भव्य ‘रोटरी अन्नोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. अन्नोत्सवाची मंडप मुहूर्तमेढ रविवारी रोटरी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. मागील 27 वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे ‘रोटरी अन्नोत्सव’ भरविला जातो. बेळगावसह देशभरातील खाद्यपदार्थ खवय्यांना एकाच ठिकाणी चाखता येतात. मागील वर्षी सावगाव रोड येथील अंगडी कॉलेज मैदानावर अन्नोत्सव झाला होता. यावर्षी सीपीएड मैदानावर अन्नोत्सव होणार असून त्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ व स्पर्धांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांनी दिली.
अन्नोत्सवाचे इव्हेंट चेअरमन डॉ. संतोष पाटील व सुनीश मेत्राणी यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी सुनीश मेत्राणी म्हणाले, यावर्षीच्या अन्नोत्सवमध्ये 185 हून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जाणार आहेत. 1 लाख 80 हजार स्क्वेअर फुटांमध्ये भव्य मंडप उभारला जाणार असून यामध्ये व्हेज, नॉनव्हेज खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. यावर्षीची खासियत म्हणजे काश्मिरी, बिहारी व दिल्ली येथील खाद्यपदार्थांचा समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सबरोबरच गृहोपयोगी वस्तू, वाहनांचे प्रदर्शन, लहान मुलांसाठी अॅम्युजमेंट पार्क यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव परिसरात घरगुती जेवण तयार करणाऱ्या महिलांसाठी सवलतीच्या दरात स्टॉल देण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळचा अन्नोत्सव वेगळा ठरेल, असा आशावाद डॉ. संतोष पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी सेक्रेटरी मनोज मायकल, तुषार पाटील, संजय कुलकर्णी, मनोज पै यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









