घरात झोपलेले असताना तीक्ष्ण हत्याराने हल्ला, खुनाच्या घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प येथील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाचा खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. या घटनेने कॅम्प परिसरात खळबळ माजली असून शनिवारी रात्रीपर्यंत हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सुधीर भगवानदास कांबळे (वय 57, रा. मद्रास स्ट्रीट, कॅम्प) असे त्याचे नाव आहे. फिश मार्केटजवळील इमारतीच्या तिसऱया मजल्यावर सुधीर आपल्या कुटुंबियांसह राहतात. शुक्रवार दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता ते आपल्या खोलीत झोपायला गेले. शनिवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता खून झालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
ही घटना घडली त्यावेळी त्यांची पत्नी व मुले घरातच होती. ते आपल्या बेडरुममध्ये झोपले होते. सुधीर यांच्या हातावर, छातीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला आहे. जिन्यावर व बाथरुममध्ये रक्ताचे डाग पडले होते. सुधीर यांचा मोठा भाऊ अरुण भगवानदास कांबळे (वय 58) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, पोलीस उपनिरीक्षक बी. आर. डुग व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. खुन्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व विधीविज्ञान प्रयोग शाळेतील तज्ञांना पाचारण करण्यात आले.
बेडरुममध्ये सुधीर यांचा मृतदेह आढळून आला आहे. घरात सुधीर, त्यांची पत्नी रोहिणी, मुलगी श्रेया, मुलगा श्रेयश यांच्यासमवेत राहत होते. पत्नी व मुले त्यांच्या बेडरुममध्ये असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. हातावर जखम असल्यामुळे नस कापून घेऊन जीवन संपविल्याचा हा प्रकार असणार का? या दिशेने विचार झाला. छातीवर व गालावरही वार झाल्यामुळे खुनाचाच प्रकार असल्याचा निर्वाळा तज्ञांनी दिला. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.
खुनाचे गूढ कायम
बेडरुममध्ये खून झालेल्या सुधीर कांबळे यांच्या खुनाचे गूढ कायम आहे. उपलब्ध माहितीनुसार ते दुबईला होते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात बेळगावला परतल्यानंतर रिअल इस्टेट व्यवसायात गुंतले होते. घरात घुसून त्यांचा कोणी खून केला? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.









