प्रेमप्रकरणाच्या संशयावरून दोरीने गळा आवळला
प्रतिनिधी/ कराड
सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून आई, वडिलांनीच पोटच्या मुलीला दोरीने गळा दाबून निर्घृणपणे संपवल्याची घटना कराड तालुक्यात घडली. मुलीचा खून केल्यानंतर आई, वडिलांनी डोंगरात खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरून विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. समाजात नाचक्की होईल, या कारणाने केलेले कृत्य तब्बल 13 दिवसांच्या पोलीस तपासानंतर उघडकीस आले. 18 एप्रिल रोजी मध्यरात्री पुरलेला मृतदेह पोलिसांनी 30 एप्रिलच्या मध्यरात्री उकरून बाहेर काढत या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला.
दरम्यान तपास करताना कराड तालुका पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगत संशयितांना बोलते केले. खून प्रकरणी मृत मुलीच्या आई वडिलांना अटक करण्यात आली आहे.
मुलीस पळवल्याचा बनाव
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील एका गावातील 17 वर्षे 11 महिन्यांची अल्पवयीन मुलगी 18 एप्रिल 2022 रोजी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कराड तालुका पोलिसांत दिली होती. शाळेत पुस्तके जमा करण्यासाठी गेलेल्या मुलीस कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. वडिलांच्या फिर्यादीवरून कराड तालुका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते यांनी तपास सुरू केला. तपास करत असतानाच पोलिसांना संशय आल्याने त्यांनी याप्रकरणी अत्यंत गोपनीयता बाळगत चौकशी सुरू केली. या चौकशीत एक धक्कादायक माहिती मिळाली. त्यामुळे या तपासावर एसपी अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, डिवायएपी रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी स्वतः लक्ष ठेवत वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी सुरू केली.
आई-वडिलांभोवती संशयाचा भोवरा
बेपत्ता अल्पवयीन मुलीचा तपास करताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. या आधारे संशयाच्या भोवऱयात दस्तुरखुद्द आई-वडीलच अडकले. सहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील, रेखा दूधभाते यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांकडे सातत्याने चौकशी करत त्यांना बोलते केले. त्यांनी पोलिसांसमोर तोंड उघडताच धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीने पोलीसही चक्रावले. पोलिसांनी वेगवान तपास करत गुह्याचा छडा लावण्यासाठी कष्ट घेतले.
गळा आवळून मृतदेह डोंगरात पुरला
पोलिसांच्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची व तिला कोणी तरी पळवून नेल्याची तक्रार हा आई वडिलांचा बनाव असल्याचे उघड झाले. 17 वर्षे 11 महिने 20 दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीचे एकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आई वडिलांना आला. यातून चिडून संशयितांनी मुलीला 18 एप्रिल रोजी मध्यरात्री घरापासून तीन, चार किलोमीटर अंतरावर डोंगरात नेले. निर्जनस्थळी अंधारात संशयितांनी पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केला. मुलीला संपवल्यानंतर त्याच ठिकाणी खड्डा काढून तिचा मृतदेह त्यांनी पुरल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात संशयितांनी मुलीचा खून केल्याची प्राथमिक कबुली देत घटनाक्रम पोलिसांना सांगितला.
रात्रीच्या अंधारातच मृतदेह उकरून काढला
संशयितांनी दाखवलेल्या जागेवर जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच खड्डा काढल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्या दृष्टीने जिथे मृतदेह पुरला आहे, तो पुन्हा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. खड्डा पुन्हा काढून रात्रीच्या अंधारातच तब्बल 13 दिवसांपूर्वी पुरलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. 1 मे रोजी पहाटे मृतदेह बाहेर काढल्यावर या गंभीर गुन्हाचा पर्दाफाश झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक करत कराड न्यायालयात हजर केले.
कराड पोलिसांचे डिटेक्शन दखलपात्र
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद स्वतः मुलीच्या वडिलांनी कराड तालुका पोलिसात दाखल केली. फिर्याद दाखल झाल्यापासून पोलिसांनी सातत्याने अनेकांकडे गोपनीय चौकशी करत या गुह्याचा छडा लावला. 13 दिवस तपास करून अखेर खळबळजनक घटना पोलिसांनी उघडकीस आणली. रात्रीच्या अंधारात डोंगरकपारीत मृतदेह खड्डय़ातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. कराड तालुका पोलिसांचे डिटेक्शन दखलपात्र ठरले.
मामा चौकशीसाठी ताब्यात
अल्पवयीन मुलीचे नात्यातील एकाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आई वडिलांनी तिचा दोरीने गळा आवळून खून केला. याप्रकरणात पोलिसांनी सोमवारी मुलीच्या मामालाही ताब्यात घेतले असून त्याच्याकडे खून प्रकरणी चौकशी सुरू होती. दरम्यान याप्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत. दरम्यान अटकेतील मुलीच्या आई वडिलांना कराड न्यायालयात हजर केले असता पाच मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.








