प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कुठेही गाजावाजा न करता बुधवारी शाहु कलामंदिर येथे साध्या पडला. ज्या ज्या शिक्षकांनी चांगली कामे केली ते शिक्षक बाजूलाच ठेवून आपल्या मर्जीतील शिक्षकांना पुरस्कार दिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु होती. दरम्यान, पुरस्कार निवडीसाठी समिती असते ती समिती सुद्धा अस्तित्वात आहे की नाही, पुरस्कारासाठी क्रायटेरिया काय हेही सांगता येत नव्हते.
शाहु कला मंदिरात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सातारा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील शाहु कला मंदिरात अतिरिक्त मुख्याधिकारी अधिकारी पराग कोडगुले यांच्या हस्ते बुधवारी दुपारी पार पडला. यावेळी प्रशासन अधिकारी मारुती भांगे, व्याख्याते वसंत हंकारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण मस्के, शैला तिरमारे, शफिरा नालाबंद, मंगल साळुंखे, विलास साळवे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आदर्श कर्मचारी म्हणून अनुपमा साळवी यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शाळा म्हणून नगरपालिका शाळा क्रमांक 8 चा सन्मान करण्यात आला. विशेष पुरस्कार अजित साळुंखे यांना प्रदान करण्यात आला. तसेच विलास शिदे, संगिता घनवट, प्रवीण पवार यांचा ही सन्मान करण्यात आला.
काम एकाचं पुरस्कार दुसऱयालाच
शिक्षण विभागात वशिलेबाजी चालते हे सर्वश्रृत आहे. परंतु पुरस्कार देताना ज्यांनी खरोखरच शाळेचा पट वाढवण्यासाठी, शाळेला भौतिक सुविधा मिळवून देण् यासाठी काम केले. त्या शिक्षकास पुरस्कार न देता काही शिक्षक नेते म्हणून मिरवतात त्यांना पुरस्कार दिला आहे. नेमका निकष काय या पुरस्काराचा अशीही चर्चा सुरु होती.
पुरस्कार सोहळा सुरु असतानाच जेवणावळी सुरु
एका बाजूला व्यासपीठावर कार्यक्रम सुरु असतानाच दुसऱया बाजूला जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. त्यामुळे याचे नियोजन पुरते फिस्कटले होते. प्रशासन अधिकारी भांगे यांनी पुरस्कारार्थी निवडताना कोणता निकष लावला होता याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.








