वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
वार्ताहर /मडकई
नवीन वर्षांरंभापासून गोव्यातील सर्व नगरपालिका क्षेत्र, किनारी भाग तसेच वन व कृषी क्षेत्र भूमिगत वीजवाहिन्याखाली आणण्याची योजना असून ती लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच मुख्य वीज केंद्रे व काही उपकेंद्रांच्या भारनियमन क्षमतेत वाढ व सुधारणा घडविण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
नववर्षांरंभी प्रसारमाध्यमांशी बोलताना वीज खात्याच्या आगामी योजना व फोंडा तालुक्याशी संबंधीत काही नियोजित विकासाच्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.
अनेक वीजकेंद्रामध्ये महत्वाच्या सुधारणा
वेर्णा, साकवाळ व साळगाव वीज केंद्रामध्येही काही महत्त्वाच्या सुधारणा होणार आहेत. राज्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही ठिकाणी नवीन उपकेंद्रे उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व नगरपालिका, किनारी भाग, वनक्षेत्र व कृषी भूक्षेत्र भूमिगत वीज वाहिन्याखाली आणण्याची महत्त्वाची योजना असल्याची माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.
मडकईतही होणार वीज विस्तार
मडकई मतदारसंघात बांदोडा किंवा कवळे पंचायतक्षेत्रात नवीन वीज उपकेंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच कुर्टी व अन्य काही वीज केंद्रांची भारनियमन क्षमता वाढवून वीज सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.
सौर उर्जा योजनेखाली राज्यात 150 मेगा व्हेट वीज निर्मितीसाठी सौर उर्जा धोरण आखले जाणार आहे. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कँपसमधील उर्वरीत विकासकामे मार्गी लावण्यात येतील. अंतिम टप्प्यात आलेला फोंडय़ातील मलनिस्सारण प्रकल्पही पूर्ण करुण कार्यान्वित केला जाईल व त्यानंतर सर्व रस्ते हॉटमिक्स करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









