कोल्हापूर :
थेट पाईपलाईनबाबत पालिकेचा भेंगळ कारभार अनेक वेळेस समोर येत आहे. परिणामी शहरवासीयांना दर एक दोन महिन्यांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसापूर्वी काळम्मावाडी धरणापासून काही अंतरावर पाईप लाईनला गळती लागली होती. या गळतीतून झाडाझुडपातून हे पाणी गेले दीड वर्षे ओढ्यातून वाहून जात होते, असे लाखो लिटर पाणी वाया गेले. काळम्मावाडी थेट पाईपलाईन या बहुचर्चित योजनेचे काम गेली दहा वर्षे सुरू होते. 2023 ला या योजनेतून शहरासाठी पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, योजना सुरु झाल्यापासून एक दोन महिन्यांतून गळती लागते तर कधी तांत्रिक बिघाड होतो. परिणामी शहराचा पाणीपुरवठा सातत्याने बंद ठेवावा लागला.
एप्रिल, मे महिन्याच्या कडक उन्हात शहरवासियांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. थेट पाईपलाईन असुनही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत आहे. यावरुन काल झालेल्या आढावा बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी पाणीपुरवठ्यावरुन पालिका प्रशासनाला जाब विचारला. शहराला स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी थेट पाईपलाईन केली. मात्र वारंवार पाणीपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे आमची बदनामी होत आहे, असे ते म्हणाले. यात होणारा तांत्रिक बिघाड लवकर समजावा यासाठी 10 आयसोलेटरची गरज आहे. पण 3 बसवले असून उर्वरित 7 आयसोलेटर बसवण्याची सुचना चार महिन्यांपूर्वीच केली होती आणि त्यासाठी येणारा पंधरा लाखाचा खर्च पालिकेच्या स्वनिधीतून करण्याचे देखील ठरले होते. ते अजून बसवले नाहीत. पावसाळ्यापूर्वीच बसवा आणि शहरवासियांना मुबलक पाणी द्या, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर शहरातील चालू असलेल्या पाण्याच्या टाकीचा व टाकण्यात येत असलेल्या अंतर्गत पाईपलाईनचा आढावा देखील त्यांनी या बैठकीत घेतला.
- महास्वच्छता अभियान राबवा
सध्या पावसाळा चालू होण्याआधी शहरातील ठिकठिकाणी साचलेला कचरा, त्याचबरोबर वळीव पावसाने झालेला कचरा उठावासाठी एक महास्वच्छता अभियान राबविण्याची सूचना आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यानुसार लवकरच पालिकेच्या वतीने हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, डीवायपी ग्रुप, नागरिक, सामाजिक संस्था तरुण मंडळे आदींना घेऊन शहर स्वच्छतेसाठी एक दिवस आपण सर्व जण रस्त्यावर उतरून स्वच्छता करु. त्यासाठी आवश्यक 100 ट्रॅक्टर, जेसीबी, ग्लोज आदी साहित्य पालिकेने पुरवले तर हे एक चांगले काम होईल. शहर स्वच्छतेला हातभार लागेल. पावसाळ्यात पाणी साचण्याची अडचण दूर होईल.यासाठी सर्वांनी एक दिवस स्वच्छतेसाठी द्यावा, असे अवाहन प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी केले.








