प्रस्तावाला संरक्षण खात्याचा हिरवाकंदील : बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतराकडे लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहत स्थानिक महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी संरक्षण खात्याने राज्य शासनाला पत्र पाठविले आहे. या प्रक्रियेअंतर्गत देशातील पहिल्या
कॅन्टोन्मेंट नागरी वसाहत हस्तांतराच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले आहे. हिमाचल प्रदेशमधील खस्योल कॅन्टोन्मेंटची नागरी वसाहत मनपात समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहतीच्या हस्तांतराकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
देशात 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड असून महापालिकालगत असलेल्या कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहत महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. या प्रक्रियेला मागील वर्षभरापासून प्रारंभ झाला आहे. देशातील विविध कॅन्टोन्मेंटच्या समावेशासाठी संरक्षण खात्याने राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला पत्र पाठविले होते. हिमाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र तसेच विविध राज्यातील कॅन्टोन्मेंट समावेशासाठी पहिल्या टप्प्यात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तसेच बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरासाठी अलीकडेच पत्र पाठविले होते. सदर पत्राची प्रत मागील आठवड्यात महापालिकेला मिळाली आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव नगरयोजना विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नगरयोजना विभागातर्फे कॅन्टोन्मेंट नागरी वसाहतीची माहिती घेऊन नकाशा व इतर प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
पण याच दरम्यान हिमाचल प्रदेशमधील खस्योल
कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहतीचे हस्तांतर महापालिकेकडे करण्याच्या प्रस्तावाला नगरविकास खाते व संरक्षण खात्याने हिरवाकंदील दर्शविला आहे. गुरुवारी या प्रस्तावाला संरक्षण खात्याने मंजुरी दिली आहे. देशातील पहिल्या
कॅन्टोन्मेंटचा समावेश महापालिकेत झाला आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद आणि तेलंगणामधील कॅन्टोन्मेंट हस्तांतर करण्याच्यादृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या समावेशाबाबत कॅन्टोन्मेंटवासियांचे लक्ष महापालिकेच्या निर्णयाकडे लागले आहे. सध्या देशातील
कॅन्टोन्मेंटना संरक्षण खात्याकडून निधी मंजूर केला जात नाही. त्यामुळे नागरी सुविधा उपलब्ध करणे मुश्कील बनले आहे. नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरी वसाहतीचा समावेश महापालिकेत लवकर व्हावा, अशी अपेक्षा कॅन्टोन्मेंटमधील रहिवासी व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रातील कॅन्टोन्मेंटचा समावेश महापालिकेत करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र बेळगाव
कॅन्टोन्मेंटबाबत पत्र आले आहे. पण पुढील कोणतीच कार्यवाही झाली नाही. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा कॅन्टोन्मेंटवासीय व्यक्त करीत आहेत. महापालिका प्रशासनाच्या निर्णयावर कॅन्टोन्मेंटचा समावेश मनपात होणार आहे. त्यामुळे शहरवासियांचे लक्ष मनपाच्या निर्णयाकडे लागले आहे.









