14 लाखाची थकबाकी असल्याने वसुली पथकाची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
मार्च एण्ड जवळ आल्याने पालिकेची वसुली मोहिम जोरात सुरु आहे. बडय़ा थकबाकीदारांची यादी तयार करुन कारवाई करण्याची सूचना मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी वसुली विभाग प्रमुख श्रीमती प्रसन्ना जाधव यांना दिल्या आहेत. श्रीमती जाधव यांनी अधिकाऱयांना कार्यवाही करण्यास सांगितले असून त्यानुसार सोमवारी दुपारी राधिका रोडवर सुमारे 14 लाखाचा कर थकवल्यामुळे दोन मोबाईलचे टॉवर सील केल्याची कारवाई केली आहे. जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वसुली विभागातून सांगण्यात आले.
सातारा पालिकेत यावर्षी वसुली विभागाची जबाबदारी एका महिला अधिकाऱयावर आहे. त्यांच्याकडून सुमारे 42 कोटींचे उद्दिष्ठ पार करण्यासाठी आणि हद्दीतील व हद्दवाढीच्या भागातील थकबाकीदारांची वसुली करण्याचे दिव्य आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सूचना दिल्या असल्या तरीही स्थानिक पुढाऱयांचा दबाव सतत वसुली विभागाच्या पथकावर असतो. पथकातील कर्मचाऱयांना आपली नोकरी प्यारी असते. तर कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱयांना आपला मतदार महत्वाचा असतो. त्यामुळे ते कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे नाव सांगून कर चुकवेगिरी करतात. विशेष करुन दोन्ही गटातील काही मोजके कार्यकर्ते ही भूमिका बजावतात. मीडियाजवळ बोलायचे एक आणि मागुन करायचे काय असा उपक्रम या स्थानिक नेत्यांचा असतो. जणू आपणाशिवाय पालिकेत पान हलत नाही. आपल्याशिवाय कोणाचे काम झाले नाही पाहिजे यासाठी सगळी सूत्रे ही मंडळी हलवत असतात. वरुन नेत्यांचे नाव सांगून कर भरु नका म्हणून सांगणारे हेच कार्यकर्ते असतात. आता प्रशासक असून मुख्याधिकाऱयांच्या सुचनेनुसार श्रीमती प्रसन्ना जाधव यांच्याकडून वसुलीची मोहिम सुरु आहे.
करंजे परिसरात राधिका रोडवर वॉरंट अधिकारी हिंमतराव पाटील, अतुल दिसले यांच्यासह कर्मचारी राजेश भोसले, प्रभाकर वाघडोळे, राहुल आवळे हे सोमवारी दुपारी गेले. तेथे सर्व्हे नंबर 313।6 चा भूखंड क्र. 4 चे मालक राजेंद्रसिंह बबनसिंह परदेशी यांचे मिळकतीचे टेरेसवरील जीटीएल कंपनीचा टॉवरचे तब्बल 9 लाख 38 हजार 438 रुपयांची थकबाकी असल्याने तो टॉवर सिल केला. त्यांना लवकरात लवकर कर भरण्याची नोटीस बजावली. तसेच सर्व्हे नंबर 287।1 ते 5 चा प्लॉट नंबर 3 चे मालक रामचंद्र राऊ शिर्के यांच्या मिकळतीचे टेरेसवरील आयडिया कंपनीचा टॉवरचा कर 5 लाख 16 हजार 683 व दंड असा थकवला असल्याने टॉवर सिल केला आहे. ज्यांचे कर थकले आहेत त्यांनी कर भरावेत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे वसुली विभागाकडून सांगण्यात आले आहे.








