कोल्हापूर / इम्रान गवंडी :
महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकाऱ्याचे पद गेल्या 11 वर्षापासून रिक्तच आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यावरच सुरू आहे. वारंवार मागणी करूनही शासन मान्यतेचा वर्ग 2 च्या पात्रतेचा प्रशासन अधिकाऱ्याची नेमणूक केली जात नसल्याने शैक्षणिक व शासकीय उपक्रम राबविण्यास मर्यादा येत आहेत.
प्रभारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद व महापालिका अशी दोन्ही कामे सांभाळताना कसरत करावी लागत आहे. तर पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नसल्यामुळे महापलिका प्राथमिक शिक्षण समितीतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. प्रशासन अधिकारी पदावर क्लास 2 च्या पात्रतेच्या अधिकाऱ्याची नेमणुकीचे आदेश असताना प्रशासनाकडून क्लास 3 च्या अधिकाऱ्याकडे प्रभारी म्हणून सोपस्कार पूर्ण केले जात आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी हे पद असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मनपा प्रशासन अधिकाऱ्यांचे काम सांभाळायला दिले जाते. दोन्ही कामे एकाच अधिकाऱ्यांकडे दिले जात असल्याने आवश्यक तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे एकडे थोडा वेळ व तिकडे थोडा वेळ असे काम करण्याची वेळ त्या अधिकाऱ्यांवर येत आहे. त्यामुळे मनपा प्रशासकीय कामावर परिणाम होत आहे. काहीवेळा अधिकारी उपलब्ध होत नसल्याने बरीच कामे रखडत असल्याचे बोलले जात आहे. अनेकवेळा जिल्हा परिषद व महापालिका अशा दोन ठिकाणचे कामकाज सांभाळताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
महापालिकेच्या एकूण 58 तर खासगी अनुदानित व विनाअनुदानित 66 शाळा आहेत. या शाळांची गुणवत्ता चांगली आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य व जिल्हा पातळीवर चमकलेले विद्यार्थ्यांचा काही दिवसापूर्वीच बेंगलोर येथील इस्त्रोच्या अवकाश संशोधनाचा अभ्यास दौऱ्याला जाऊन आले. महापालिकेच्या मुलांनी या अभ्यास दौऱ्याद्वारे हवाई सफर करत हम भी कुच्छ कम नहां… चा प्रत्यय सर्वांच्या डोळ्यासमोर आणून दिला आहे. यावरूनच महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता व दर्जा स्पष्ट होते. असे असताना शासन मान्यतेचा पूर्ण वेळ प्रशासन अधिकारी असणे गरजेचे आहे. यामुळे शासकीय योजना राबविण्यास गती मिळू शकते.
आता लवकरच शाळांच्या वार्षिक परिक्षा होणार आहेत. यानंतर नवीन शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या पुस्तकांची छपाई, गणवेश, पोषण आहार, नवीन प्रवेश प्रक्रीया आदी महत्वाचे कामकाज करावे लागणार आहेत.
- गरज क्लास 2 ची पण नियुक्ती क्लास 3 ची
मनपा प्रशासन अधिकारी पदावर क्लास 2 पात्रतेचा सक्षम अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या 11 वर्षापासून क्लास 3 पात्रतेचा प्रभारी प्रशासन अधिकारी नेमला जात आहे. त्यामुळे पुर्णवेळ शासन नियुक्त अधिकार कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- शाळांची स्थिती :
शहरातील एकूण महापालिका शाळा : 58
एकूण विद्यार्थी : 10600
सेमी इंग्रजी माध्यम : 19
उर्दु माध्यम : 5
एकूण शिक्षकांची संख्या : 374
खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा : 66
एकूण विद्यार्थ्यांची संख्या : 25 हजार
- पाठपुरावा करू
महापालिका प्रशासन अधिकारी पदावर महाराष्ट्र शिक्षण सेवा अंतर्गत शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत नेमणूक केली जाते. यासाठी पूर्वी वेळोवेळी मागणी केली आहे. शासन नियुक्त अधिकारी नियुक्तीसाठी प्रक्रीया राबवून पाठपुरावा करू.
उज्वला शिंदे, मनपा, सहाय्यक आयुक्त








