कोल्हापूर :
नवीन कराचा बोजा नसलेला दरवर्षीप्रमाणे हजार कोटींहून अधिकचा अर्थसंकल्प महापालिकेच्या उपसमितीने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना बुधवारी सादर केला. पाणीपट्टी तसेच घरफाळ्यात कोणतीही वाढ न करता सर्वसमान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न बजेटच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाने केला. मात्र नगररचना विभाग, इस्टेट विभाग तसेच परवाना विभागाकडील फी शुल्कात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्य व्यक्ती नजरेपुढे ठेवून बजेट तयार केल्याची प्रतिक्रिया के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.
महापालिकेचे गतवर्षी स्वउत्पन्न 651 कोटी 69 लाख रुपये होते. आस्थापनासह विविध योजनांवर 651 कोटी 52 लाख खर्च झाला. यंदाच्या वर्षी महापालिकेच्या तिजोरीत फक्त 17 लाख रुपये शिल्लक असून येत्या वर्षासाठी 707 कोटी 64 लाख रुपयांचे महसुली उत्पन्नाचे उदिष्ट गृहित धरले असून येत्या वर्षात यातील 707 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च होणार आहेत. मनपा तसेच पाणी पुरवठा विभागाची 224 कोटी 94 लाख भांडवली जमा तर खर्च 224 कोटी 77 लाख रुपये गृहीत धरला आहे. शासनाच्या विविध विशेष योजनांतून 360 कोटी 22 लाख रुपये तर वित्त आयोगाकडून 42 कोटी असे महसुली, भांडवली आणि विशेष प्रकल्प तसेच वित्त आयोग मिळून 1334 कोटी 76 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडून सध्या 58 शाळा सुरू आहेत. यातील 17 शाळांमध्ये सेमी इंज्रजी माध्यमांचे वर्ग सुरू असून यामध्ये तीन शाळांची भर नव्या वर्षात पडणार आहे. प्राथमिक शिक्षण समितीने सन 2025-26 साठी शासनाकडे प्रस्तावित तरतूद 37 कोटी 40 लाख 57 हजार तर महापालिकेकडे 64 कोटी 45 लाख रुपयांचे एकत्रित असे 102 कोटी 38 लाख 13 हजार रुपयांचे अर्थ संकल्प के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे सादर केले.








