कोल्हापूर :
महानगरपालिकेच्या लाईन बझार येथील डंपिंग ग्राऊंडवर पडुन असलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आकांक्षा एंटरप्रायजेस या दिल्लीच्या कंपनीला ठेका दिला आहे. त्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करुन जागा मोकळी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शहरात रोज तयार होणारा दोनशे ते अडीचशे टन कचरा हा डंपिंग ग्राऊंडवर महापालिकेकडून टाकला जातो. त्यापैकी सध्या पालिकेकडून 50 ते 60 टन कच्रयावर प्रक्रिया केली जात असून यातून राहिलेला कचरा व जुना कचऱ्याचे ढीग डंपिंग ग्राऊंडवर पडुन आहेत. दररोज सुमारे दिडशे हुन अधिक टिप्पर कचरा गोळा करतात. झूम प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्यापासून कमी अधिक प्रमाणात खतनिर्मिती करण्यात येत असून पालिकेकडून सध्या पडुन असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी दिल्लीच्या खासगी कंपनीला ठेका दिला आहे.
सध्या झूम प्रकल्पावर 130 कर्मचारी शिफ्टमध्ये काम करत भागांतून घराघरातून संकलित होणारा कचरा टिप्परमधून या ठिकाणी येतो. सध्या प्रकल्प स्थळावर रोज येणारा सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी मशिनरी लावण्यात आली आहे. पोकलँनद्वारे या मशिनवर हा कचरा टाकण्यात येतो. या ठिकाणी विघटन न झालेले अन्नपदार्थ, प्लास्टिक, दगड–माती, कापड, फळांचे तुकडे, असे प्रत्येक घटक वेगळे करण्यात येतात. त्यानंतर विघटन न झालेले अन्नपदार्थ कंपोस्ट खतासाठी पाठविले जातात, तर दुसऱ्या बाजूला ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसनिर्मितीसाठी प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये तयार होणारा गॅस स्वतंत्र पाईपलाईनद्वारे प्रकल्पात पाठविला जातो. एकूणच दैनंदिन संकलन होणाऱ्या घरगुती कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. हे काम खासगी एजन्सीला देण्यात आले होते; मात्र मुदत संपल्याने संबंधित कंपनीकडून प्रकल्प आपल्या ताब्यात घेऊन सध्या महापालिका प्रशासन चालवित आहे.
पण दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असताना जुन्या कचऱ्याचा ढिगाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी असणारा मायनिंग प्रकल्प बंद असल्याने प्रकल्प स्थळावर डोंगर उभे राहत आहेत. म्हणून पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून बायोमायनिंगचा ठेका दिला आहे. प्रथम वालचंद कॉलेजकडून पडून असलेल्या कचऱ्याचे मोजमाप होईल आणि मग कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. यामध्ये कंपनीकडून कचऱ्याचे क्रिनिंग करून प्लास्टिक, खरमाती, दगड, काच व इतर घटक वेगळे करण्यात येणार आहेत.
- असा आहे प्रकल्प
यापूर्वी पहिल्या टप्प्यात पुण्याच्या पी.एच.जाधव आणि कंपनीने तीन लाख 52 हजार 518 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली असुन त्यासाठी 19 कोटी 75 लाखाचा खर्च आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात दिल्लीच्या आकांक्षा एंटरप्रायजेसकडून 1.67 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन घेण्यात येणार असुन त्यासाठी कंपनीला 9.23 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
- नाहीतर ये रे माझ्या मागल्या
सध्या पडुन असलेल्या कचऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्चून प्रक्रिया करुन महापालिका जागा मोकळी करणार आहे. पण नंतर येणाऱ्या कचऱ्यावर नियमित प्रक्रिया केली नाहीतर पुन्हा असे कचऱ्याचे डोंगर साचुन पुन्हा एखादी नवीन कंपनी बायोमायनिंगसाठी बोलवावी लागणार हे थांबवायचे असेल तर रोज येणाऱ्या कच्रयावर नियमित प्रक्रिया करावी लागणार आहे. नाहीतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होणार आहे.








