पोलीस, मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई : काहीकाळ तणाव
प्रतिनिधी /बेळगाव
कांदामार्केट परिसरात रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन अनधिकृतरित्या खोके उभारण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खोका हटविण्याची मागणी केली. त्यानंतर महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने उभारण्यात आलेला खोका हटविण्याची कारवाई केली. त्यावेळी कांदामार्केट परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कांदामार्केट परिसरात अनधिकृत खोके उभारण्याचे पेव वाढले आहे. भाजी विक्री करण्यात येणाऱ्या ठिकाणी सावलीसाठी काही व्यावसायिक छत्र्या लावत असतात. पण काहींनी पत्र्याचे शेड उभारले असल्याने अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अन्य व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास आक्षेप घेतला जातो. प्रत्येक जागा जणू प्रत्येक व्यावसायिकाने खरेदी केल्याप्रमाणे हक्क सांगत असतात. त्यामुळे कांदामार्केट परिसरात नेहमी वादावादीचे प्रसंग घडत असतात. याच परिसरात मसाले पदार्थ विक्री करण्यात येणाऱ्या परिसरात रात्रीच्यावेळी नवीन गाळे उभारण्याचा प्रकार सुरू आहे. काही नागरिकांना वेल्डींग करण्याचा आवाज सोमवारी मध्यरात्री ऐकू आला. त्यामुळे त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता खोका उभारण्याचे काम निदर्शनास आले.
याबाबत येथील नागरिकांकडे विचारणा केली असता परवानगी घेऊन खोका बसवित असल्याचे सांगितले. परवानगी पत्र दाखविण्याची विनंती केली असता एका मागोमाग एक असे सात ते आठ नागरिक याठिकाणी जमा झाले व परवानगी घेऊनच काम करीत असून विचारणारे तुम्ही कोण, असे उद्धट बोलले. त्यामुळे सदर व्यक्तीने पोलीस स्थानकात संपर्क साधून याबाबतची माहिती दिल्याने
गस्तीचे वाहन त्या ठिकाणी रात्री दाखल झाले. पोलिसांनी चौकशी करून काम थांबविण्याची सूचना करून निघून गेले. पण खोकेधारकांनी काम थांबविले नाही. सकाळपर्यंत खोका पूर्णपणे तयार करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील विविध भागातील हिंदू संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले. खोका उभारण्याची परवानगी दाखवा, अन्यथा खोका हटवा, अशी सूचना केली. तसेच तुम्ही खोका हटविला नाहीत तर आम्ही हटवू, अशी भूमिका घेतली. याची माहिती पोलीस स्थानकाला आणि महापालिकेला कळविण्यात आली.
पोलीस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सविस्तर माहिती घेऊन अनधिकृत खोका हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने सदर खोका हटविण्यात आला. यादरम्यान वादावादी निर्माण झाल्याने कांदामार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण अनधिकृत खोका असल्याने याबाबत महापालिकेने कारवाई केली.









