प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील गोवा शिपयार्डसमोरील मुंडवेल वाडे भागात पुन्हा दरड कोसळून एका घराचे नुकसान झाले. सदर कुटुंबाला तातडीने घर खाली करावे लागले आहे. सदर डोंगरावरील दरड कोसळण्याची भीती तेथील लोकांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती.
गोवा शिपयार्डसमोरील मुंडवेल वाडे भागात गेल्या काही वर्षांपासून दरड कोसळत आहे. नवेवाडेच्या पायथ्याशी हा भाग असून या भागात अनेक घरे आहेत. दरवर्षी त्यांना दरड कोसळण्याची भीती सतावत असते. यापूर्वी दरड कोसळून काही घरांचे नुकसान झालेले आहे. काहींना दरडींच्या भितीमुळे तेथील घरे खाली करावी लागलेली आहेत. दोन वर्षांपूर्वी दरड घरात घुसून एका महिलेला मृत्यू आला होता. या समस्येची पाहणी बऱयाच वेळा झालेली आहे. मात्र, ठोस उपाययोजना करणे सरकारला अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे धोका कायम आहे. सध्या पडत असलेल्या संततधार पावसात पुन्हा दरड कोसळून नुकसान होईल अशी भिती लोकांनी व्यक्त केली होती. काल गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास झाडासह दरड खाली कोसळली. या दरडीने घराच्या भिंतीला धक्का देऊन भिंतीला भोक पाडले व इतर ठिकाणी भेगाही पडल्या. सदर कुटुंबाला या घटनेमुळे तातडीने घर खाली करावे लागले आहे.
आमदार दाजी साळकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरडी कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे अत्यंत आवश्यक असून पुढील पावसाळय़ापूर्वी संरक्षक भिंत उभारण्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे आमदार साळकर यांनी म्हटले आहे.