आमदार विनय कोरे यांची घेतली भेट
वारणानगर / प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट घेतली. मतदारसंघाच्या विकास कामासंदर्भात ही भेट असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचे कोल्हापुरात येताना जंगी स्वागत झाले होते. खासदार माने आपली भूमिका मांडण्यासाठी मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यातील नेत्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून आपण शिंदे गटात मतदारसंघाच्या विकासासाठीच गेलो. आपला निर्णय जनतेच्या हितासाठी घेतलेला आहे मतदारसंघाच्या विकासासाठी घेतलेला आहे ही बाजू स्पष्टपणे सर्वांना समजून सांगावी आपल्याला सहकार्य मिळावे यासाठीच सर्वांच्या भेटी घेत असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मतदार संघातील ‘पेठ-सांगली’ व ‘हातकणंगले-सांगली’ या दोन्ही मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात समावेश होऊन त्याला निधी मंजूर केला आहे. अनेक विकास कामांना गती मिळावी निवडून दिलेल्या मतदारांना न्याय मिळावा यासाठी प्रवाह बरोबर राहून विकास करता यावा आमदारांशी समन्वय साधून सर्वच कामे चर्चा होऊन कशी मंजूर करून घेता येतील व नियोजनपूर्वक विकास कसा केला पाहिजे यासाठी मी सर्वांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले.
विनय कोरे यांच्या माध्यमातून पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघात तसेच हातकणंगलेसह जिल्हात इतर ठिकाणी विकासात्मक धोरण राबवण्याबाबत चर्चा झाली आहे. सर्व नेते कार्यकर्ते यांची भेट घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले. यावेळी केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, वारणा दूध संघाचे संघाचे संचालक प्रदिप देशमुख उपस्थित होते.