तापसी पन्नूकडून निर्मिती
तापसी पन्नू सध्या ‘डंकी’ या स्वत:च्या आगामी चित्रपटावरून चर्चेत आहे. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसून येत आहे. तापसी आता निर्माती म्हणून देखील कार्यरत आहे. तिने ब्लर या चित्रपटाद्वारे निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. तर तापसीचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

तापसीच्या ‘धक धक’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांची फौज आहे. चित्रपटात रत्ना पाठक, फातिमा सना शेख, दीया मिर्झा आणि संजना सांघी हे कलाकार दिसून येत आहेत. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वत:च्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये असलेल्या चार महिलांची हृदयस्पर्शी कहाणी यात दिसून येणार आहे. या महिला बाइकवरून सर्वात उंच प्रवासयोग्य खिंडीपर्यंत प्रवास करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण डुडेजा यांनी केले आहे. तर चित्रपटाची कहाणी पारिजात जोशी यांची आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले असून याचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित केला जाणार आहे. तापसी याचबरोबर आनंद एल. राय यांच्या ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि विक्रांत मैसी यांच्यासोबत दिसून येणार आहे. तसेच ती प्रतीक गांधीसोबत ‘वो लडकी है कहां’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. अक्षय कुमारसोबत ‘खेल खेल में’ या चित्रपटात देखील ती काम करत आहे.









