खडकाळ भिंतींमध्ये ठेवण्यात आली पुस्तके
माणूस वास्तव्याच्या ठिकाणी सर्व सुविधा इच्छितो, या सुविधांसोबत निसर्गाची साथ मिळावी असेही त्याला वाटत असते. याचमुळे शहर सुविधांनी युक्त असतात, तरीही अनेक लोक शहरांना पसंत करत नाहीत. ते निसर्गाच्या सान्निध्यात अन् शांततेत राहू इच्छितात. वाचनालयात लोक शांततेत वाचन करू इच्छितात आणि तेथे जगातील प्रत्येक पुस्तक वाचायला मिळावे अशी इच्छा असते. तरीही अधिकाधिक लोकांचा विचार करत वाचनालय फार दूर किंवा एकांतात निर्माण केले जात नाही. परंतु चीनच्या मियानहुआ गावातील वाचनालय अनोखे असून ते खडकाळ भिंतीत एका मोठ्या गुहेत निर्माण करण्यात आले आहे.
हे वाचनालय मे महिन्यात सुरू झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वसाधारणपणे वाचनालय ऑनलाइन चर्चेचा विषय असत नाही, परंतु हे साधारण वाचनालय नाही. केवळ पुस्तकप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र नसून मनमोहन दृश्यांचा शोध घेणाऱ्या पर्यटकांसाठीही खास ठिकाण आहे.
या वाचनालयात बसून अनोख्या दृश्यांचा आनंद घेता येतो. हिरवाईने नटलेल्या खोऱ्यांनी वेढलेले हे वाचनालय उंच खडकांच्या काठावर आहे. खडकांना कापून हे वाचनालय निर्माण करण्यात आले आहे. येथे पोहोचल्यावर एखाद्या वाचनालयात जातोय, असे प्रथमदर्शनी वाटणारच नाही. खडकांवर लटकणारे लाकडी रस्ते आणि बाल्कनी तयार करण्यात आल्या आहेत. तेथे भिंतींवर हजारोंच्या संख्येत पुस्तके ठेवण्यात आली आहेत.
खास देखभालीची गरज
चीनमधील हे वाचनालय पूर्णपणे गुहेच्या आत नाही, याच्या खडकाच्या दिशेने मार्ग आणि पुस्तके ठेवण्याच्या जागांना हवामान खासकरून आर्द्रतेपासून वाचवायचे असते, पुस्तकांना खासकरून आर्द्र हवेपासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तसेच तापमानही कायम राखावे लागते. हा खडक पूर्णपणे ग्रामीण भागात असून स्थानिक लोक या वाचनालयात येऊ शकतात. परंतु हे वाचनालय आता एक पर्यटनस्थळ म्हणून अधिक प्रसिद्ध होत आहे. येथे चीनच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि येथील निसर्गाचे दृश्य त्यांना निराशही करत नाही.









