अलिकडच्या काळात सर्वत्र गोंगाट आणि अशांतताच अनुभवास येत आहे. या वातावरणामुळे लोकांना अनेक तऱ्हेच्या शारिरीक आणि मानसिक व्याधी होतात. अशांत वातावरणाचा परिणाम माणसाच्या निर्णय शक्तीवर किंवा बौद्धिक क्षमतेवरही होत असतो. त्यामुळे या ध्वनिप्रदूषणाला आणि गोंगाटाला कंटाळलेली माणसे प्रत्येकवर्षी कोणत्या ना कोणत्या ‘शांत’ स्थानी काही दिवस वास्तव्य करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना शक्य होते, ती माणसे निश्चितच असे करतात. तथापि, अतिशांतताही गोंगाटाइतकीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक त्रासदायक असते, हे सिद्ध करणारे एक स्थान जगात आहे. अमेरिकेतील ‘मिनियापोलीस’ शहरातील ‘एनॅकोईक चेंबर’ हे ते स्थान आहे. या स्थानाला जगातील सर्वात शांत स्थान म्हणून परिचय मिळाला असून त्याची नोंद गिनिज विक्रमपुस्तिकेतही करण्यात आली आहे.
या स्थानी ध्वनीची क्षमता -24.9 डेसिबल्स इतकी आहे. सर्वसामान्य माणसाची श्रवण क्षमता 10 डेसिबल्स ते 120 डेसिबल्स इतकी असते. याचा अर्थ 10 डेसिबल्सपेक्षा कमी आणि 120 डेसिबल्सपेक्षा अधिक तीव्रतेचा ध्वनी माणसाला ऐकू येत नाही. मात्र या स्थानातील ध्वनी क्षमता माणसाच्या ऐकू येण्याच्या किमान क्षमतेपेक्षाही कितीतरी कमी आहे. इतकी भयाण शांतता माणसाला अस्वस्थ करुन सोडते. म्हणूनच आजपर्यंत या स्थानी एकही माणूस 45 मिनिटांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करु शकलेला नाही. या स्थानी आपल्याला आपल्या हृदयाची धडधड आणि आपल्या शरीराच्या अवयवांमधून उमटणारा ध्वनीचेही श्रवण करता येते, असा अनुभव या स्थानी काही काळ व्यतीत केलेल्यांनी व्यक्त केला आहे. जगातील अद्भूत स्थानांपैकी हे एक आहे.









