सध्या जगात अनेक नवनवी शस्त्रास्त्रे आणि संरक्षण साधने निर्माण करण्याची जणू स्पर्धाच विविध देशांमध्ये लागली आहे. अगदी ‘शांत’ म्हणवून घेणारे देशही आश्चर्यकारक शस्त्रांची निर्मिती करुन आपले वेगळेपण सिद्ध करु लागले आहेत. तथापि, पूर्वीच्या काळातही अशा प्रकारची जगावेगळी शस्त्रे किंवा साधने निर्माण केली जात होतीच. त्यांच्यातील काही लोकप्रिय झाली तर काही झाली नाहीत.
अशांमधीलच एक आहे ‘कुगेलपेंजर’ नामक रणगाडा. तो दिसायला एखाद्या मोठ्या गोलासारखा वाटोळा दिसतो. त्याची चाके, साखळ्या, तोफ किंवा बंदुकीची नळी, त्याला उघडण्याचे दार इत्यादी काहीही वरुन पाहता दिसून येत नाही. किंबहुना, तो रणगाडा वाटतच नाही, इतके त्याचे आरेखन विचित्र आहे. आज इतक्या वर्षांनंतरही या रणगाड्याची अनेक रहस्ये उकललेली नाहीत.
त्याची निर्मिती जर्मनीतील नाझी प्रशासनाने केली होती. दुसऱ्या महायुद्धात त्याचा उपयोग केला जाणार होता. काही प्रमाणात तो केलाही गेला. तथापि, तो प्रयोग फारसा यशस्वी झालेला नसावा, असे तज्ञांचे मत आहे. नंतरच्या काळात जर्मनीची जपानशी मैत्री वाढली. दोन्ही देशांनी शस्त्रास्त्रांचे उत्पादन संयुक्तरित्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी हा रणगाडा जपानला देण्यात आला होता. जपानने त्यावर बरेच संशोधन केले होते. हा रणगाडा म्हणजे एक चिलखती वाहनच होते. त्यात केवळ एक सैनिक बसू शकत होता. तो रणगाडा किंवा सैनिकी वाहनासारखा दिसत नसल्याने शत्रूची फसवणूक करणे शक्य होईल, असा त्याच्या निर्मात्यांचा कयास असावा, असे बोलले जाते. हा रणगाडा फारसा यशस्वी ठरला नसला तरी, त्याच्या निर्मितीमुळे अशी फसवी शस्त्रे, वाहने किंवा साधने निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यातून आज अशाप्रकारची, शत्रूची दिशाभूल करणारी अनेक शस्त्रे निर्माण केली जात आहेत, असे तज्ञांचे मत आहे.









