रात्री पाण्याला प्राप्त होतो निळा रंग
पृथ्वीवर अशा अनेक जागा आहेत, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. अशाचप्रकारचे एक रहस्यमय सरोवर असून रात्रीच्या वेळी त्यातील पाणी अचानक निळ्या रंगाचे होते. स्वत:च्या रंगामुळे हे सरोवर आता जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. वैज्ञानिकांनी यासंबंधी अनेक प्रकारचे दावे केले असले तरीही याचे रहस्य अद्याप कायम आहे.

इंडोनेशियातील कावाह इजेन सरोवर दिसण्यास अत्यंत साधारण सरोवरासारखे आहे, परंतु या सरोवरातील पाणी सर्वाधिक आम्लीय आहे. या सरोवरातील पाण्याचे तापमान अत्यंत अधिक आहे. सरोवराचे पाणी दिवसा सामान्य दिसून येते, परंतु रात्र होताच यातील पाणी निळ्या रंगाचे होऊ लागते. मध्यरात्री तर हे पाणी निळ्या रंगाच्या दगडाप्रमाणे चमकू लागते. याचे तापमान अधिक असल्याने येथे पर्यटक येऊ शकत नाहीत, कारण उष्णतेमुळे येथे कुणालाच थांबता येत नाही. वैज्ञानिक देखील लांब अंतरावरून सरोवराची पाहणी करत असतात.
दशकांपासून या सरोवराचे रहस्य उलगडण्यासाठी वैज्ञानिक संशोधन करत आहेत, परंतु अखेर रात्री याच्या पाण्याचा रंग निळा का होतो याचे उत्तर त्यांना अद्याप शोधून काढता आलेले नाही. सरोवराच्या आसपास अनेक ज्वालामुखी असल्याने हा प्रकार घडत असावा असे बोलले जाते. ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे बाहेर पडणाऱ्या हायड्रोजन क्लोराइड, सल्फ्युरिक डायऑक्साइड यासारख्या अनेक वायूंच्या रिअॅक्शनमुळे पाण्याचा रंग बदलत असावा अशीही एक थिअरी आहे. परंतु या वायूंमुळे पाण्याचा रंग बदलत असेल तर तो केवळ रात्रीच का बदलतो हा प्रश्न उपस्थित होतो.









