येथे होत नाही चोरी, दुकानदार खुले ठेवतात दुकान
सद्यकाळात जगात चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांचा पूर्ण वेळ गुन्हेगारांना पकडण्यात खर्ची पडत आहे. अशास्थितीत एक असे गाव आहे, जेथे आजवर चोरी झालेली नाही. हे अनोखे गाव भारतातच आहे. नागालँडमधील खोनोमा हे गाव सध्या चर्चेत आले आहे.
खोनोमा गावाला भारतातील पहिले ग्रीन व्हिलेज म्हटले जाते. या गावाचा इतिहास 700 वर्षे जुना असून येथे अंगामी समुदायाचे लोक राहतात. या आदिवासींनी भारताच्या स्वातंत्र्यातही योगदान दिले आहे. याचबरोबर त्यांनी स्वत:चे गाव वाचविण्यासाठी अनेक नियम तयार केले आहेत. या नियमांचे पालन येथील लोक करत असतात. यात जंगलातील वृक्षाची तोड न करणे, शिकारीवर बंदी सामील आहे. परंतु याचबरोबर हे गाव अन्य कारणाने देखील ओळखले जाते. या गावाला जगातील सर्वात प्रामाणिक गाव म्हटले जाते, कारण आजवर या गावात एकही चोरी झालेली नाही.
दुकानात नसतात दुकानदार
या गावात अनेक दुकाने दिसून येतील. येथे लोकांना स्वत:साठी आवश्यक सर्व सामग्री मिळेल, परंतु येथे कुठलाच दुकानदार दिसून येणार नाही. येथे दुकानांमध्ये सामग्री घेतल्यावर ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये लोक स्वत:हून पैसे ठेवत असतात. आजवर या गावात चोरीची एकही घटना घडलेली नाही. अशा स्थितीत बहुतांश लोक स्वत:च्या घराला कुलूप लावत नाहीत.
अत्यंत खास गाव
या गावाला भारताचे पहिले ग्रीन व्हिलेज म्हटले जाते. 2011 च्या जनगणनेनुसार गावात एकूण 424 परिवारांचे वास्तव्य आहे, येथील लोक मार्शल आर्ट्स आणि शौर्यासाठी ओळखले जातात. पूर्वी या गावात शिकार केली जात होती, परंतु 1998 मध्ये लोकांनी स्वत:च यावर बंदी घातली. येथे झाडांची तोड करण्यास मनाई आहे. जर कुणाला काही तयार करवून घ्यायचे असेल तर तो केवळ झाडांच्या फांद्या तोडू शकतो. हे गाव देशातील अन्य गावांसाठी उदाहरण ठरले आहे.









