खरेदी करणे सर्वांना नाही शक्य
जगातील सर्वात महाग साबण किती रुपयांचा असेल असा प्रश्न विचारल्यास तुमचे उत्तर हजार किंवा दोन हजार रुपयांचा असेल असे तुम्ही सांगाल. परंतु हे उत्तर बरोबर नाही. जगात एक असा साबण आहे, ज्याची किंमत जाणून घेतल्यावर तुमचे डोळे विस्फारून जातील. या साबणाच्या किमतीत तुम्ही सोन्याचा हार खरेदी करू शकतात. या साबणाच्या निर्मितीकरता सोने अन् हिऱ्यांचा वापर केला जातो. याचमुळे याची किंमत प्रचंड आहे. या साबणाचे ग्राहक देखील काही खास लोकच आहेत.

लीबियाच्या त्रिपोलीमध्ये हा साबण तयार केला जातो. याची किंमत 2800 डॉलर्स म्हणजेच 2 लाख 7 हजार 800 रुपये इतकी आहे. हा साबण तयार करणाऱ्या कंपनीचे नाव बशर हसन अँड सन्स आहे. हा साबण या कंपनीचे मालक स्वत:च्या हातांनी तयार करतात. साबणाला त्यांनी द खान अल साबुन हे नाव दिले आहे. याचबरोबर कंपनीत अनेक लक्झरी सोप अन् क्रीम्स तयार करण्यात येतात. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये केवळ शुद्ध गोष्टींचाच वापर केला जातो. त्रिपोलीत या ठिकाणी साबण तयार करण्याचा उद्योग 15 व्या शतकापासून सुरू आहे.
बदर हसन अँड सन्सनुसार साबणाची पट्टी सोने आणि हिऱ्याच्या पावडरद्वारे तयार होत असते. सोने आणि हिऱ्याच्या पावडरमुळे साबणाची शानदार पट्टीची रचना खडबडीत असते, परंतु जर तुम्ही तो शरीरावर चोळला तर ईजा होत नाही. प्रारंभी हा साबण एका पनीरच्या तुकड्याप्रमाणे दिसून यायचा. नंतर याच्या रचनेत सुधारणा करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीचे सीईओ अमीर हसन यांनी बहारीनचे अभिनेते शैला साबट यांना हा साबण भेट केला होता. तेव्हा सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली होती.
बहुतांश ग्राहक दुबईतील
कंपनीकडून शरीराला उपयुक्त आवश्यक तेल आणि नैसर्गिक सुगंध असलेले विविध प्रकारचे लक्झरी साबण तयार करण्यात येतात. हा हस्तनिर्मित लक्झरी साबण संयुक्त अरब अमिरातच्या काही सर्वात विशिष्ट दुकानांमध्ये विकण्यात येतो. याचे बहुतांश ग्राहक दुबई शहरातील आहेत. परंतु काही अत्यंत महत्त्वपूर्ण लोकांनाच हा साबण देण्यात येतो. हा साबण पहिल्यांदा 2013 मध्ये तयार करण्यात आला होता. तो कतारच्या प्रथम महिलेला प्रदान करण्यात आला होता. साबणात 17 ग्रॅम सोने असते, तर काही ग्रॅम हिऱ्याची पावडर, ऑर्गेनिक मध, खजुरासमवेत काही गोष्टींमुळे हा साबण खास ठरत असतो.









