1 किलो तांदळाची किंमत अत्यंत अधिक
भारतीयांच्या दैनंदिन आहारात तांदूळ आणि गव्हाचा मोठा हिस्सा आहे. कार्बोहाडड्रेट म्हणून याच धान्यांना भारतीय स्वत:च्या आहारात सामील करत आले आहेत. याचमुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि किमतीचे तांदूळ आणि गहू उपलब्ध आहेत. स्वत:चे बजेट आणि गरजेनुसार यातील धान्यप्रकाराची निवड केली जाते.
सर्वसाधारणपणे चांगल्या आणि प्रीमियम क्वालिटीच्या तांदळाची किंमत 100-200 रुपये प्रतिकिलो असू शकते. परंतु तांदळाचा एक प्रकार याच्या 100 पट अधिक किंमतीत विकला जातो. हा तांदूळ भारतात पिकत नाही तसेच तो सहजपणे उपलब्ध देखील होत नाही. कारण या तांदळाचे पिक जपानमध्ये घेतले जाते.
अत्यंत खास जपानी तांदूळ
किंमेमाइ प्रीमियम नावाचा जपानी तांदूळ जगातील सर्वाधिक किंमत असलेला तांदूळ आहे. याचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे. किंमेमाइ प्रीमियम राइस रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा दावा केला जातो. या जपानी तांदळाचे एकूण 5 प्रकार 17 वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले होते. याचा स्वाद नट्सप्रमाणे असतो आणि याचे पॉलिशिंग इतके जबरदस्त असते की हे हिऱ्यांच्या छोट्या तुकड्यांप्रमाणे दिसतात.
6 पट अधिक एलपीएस
या तांदळात 6 पट अधिक एलपीएस असल्याचा दावा करण्यात येतो. नैसर्गिक स्वरुपात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात यामुळे मदत होते. यात पारंपरिक तांदळापेक्षा 1.8 पट अधिक फायबर आणि 7 पट अधिक व्हिटॅमिन बी1 असते. हा तांदूळ शिजविण्यापूर्वी धुण्याची गरज नसते आणि खाण्यात हा काहीसा गोड अन् सुगंधी असतो. याची किंमत 2016 मध्ये 9,123 रुपये प्रतिकिलो इतकी होती. तेव्हा याला जगातील सर्वात चांगला तांदूळ घोषित करण्यात आले होते. परंतु आता याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.