दागिन्यांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या ते न परवडणाऱ्या अशा विविध मर्यादेतील असतात, हे आपल्याला माहिती आहे. महाग आणि कलाकुसरयुक्त सुंदर दागिन्यांचे आपल्याला नेहमीच आकर्षण असते. ते विकत घेण्याची क्षमता नसली तरी ते पाहण्याचा आनंदही मोठा असतो, हे सर्वजण मान्य करतात.
या पार्श्वभूमीवर जगातील सर्वाधिक महाग आणि सुंदर दागिने कोणते आणि ते कोणाकडे आहेत, या प्रश्न निर्माण होते. अर्थातच, त्याचे उत्तर देणे सोपे नाही. कारण महाग आणि सुंदर दागिन्यांचे प्रकार, संख्या आणि त्यांचे स्वामित्व हे जगातील अनेकांकडे असू शकते. पण, संशोधकांनी आणि तज्ञांनी जगातील सर्वात महागड्या सहा आभूषणांची एक सूची बनविली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.
- अॅटल्ला क्रॉस : या सहांपैकी सर्वात महाग आभूषण अॅटल्ला क्रॉस हे आहे. त्याची निर्मिती 1920 मध्ये ब्रिटनमधील आभूषणकार जेराड यांनी केली. हे आभूषण एमेथिस्टपासून बनलेले आहे. हा एक क्रॉस असून त्यात 5.2 कॅरटचे हिरे जडविलेले आहेत. काही वर्षांपूर्वी हा क्रॉस ब्रिटनची गाजलेली राजकन्या डायना हिच्या गळ्यात होता. सध्या तो किम कार्देशियन हिने 62 लाख रुपयांना खरेदी केला आहे. याच केवळ किमतीच्या दृष्टीने नव्हे तर धार्मिक महत्वही आहे.
- काळा हीरा : तक्क्याच्या आकाराचा हा काळा हीरा अत्यंत दुर्मिळ आहे. त्याचे वजन 67.49 कॅरट आहे. विशेष म्हणजे हा मूळचा भारताचा असून त्याची चोरी 10 व्या शतकात ब्रम्हदेवाच्या मंदिरातून झाली होती. तो ज्याच्याकडे असेल त्याचा मृत्यू अकाली होतो, अशी समजूत आहे. त्याची चोरी करणाऱ्याचा तरुण वयातच मृत्यू झाला. नंतर तो ज्या तिघांच्या हाती गेला त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये रशियाची राजकन्या नादिया आणि तिचा एक नातेवाईक यांचा समावेश आहे. त्यानंतर त्याचे तीन तुकडे करण्यात आले. तो एकसंध होता तेव्हा त्याची किंमत कल्पनेपेक्षाही अधिक होती, असे बोलले जाते.
- पिलग्रिम पर्ल : पर्ल याचा अर्थ मोती असा आहे. हा मोदी जगातील सर्वात मोठा मानला जातो. पांढऱ्याशुभ्र रंगाच्या या मोत्याचे वजन 50.56 कॅरट इतके आहे. स्पेनचा सम्राट फिलिप द्वितीय याने तो आपल्या पत्नीसाठी म्हणजेच ब्रिटनची राणी प्रथम मेरी हिच्यासाठी खरेदी केला होता. 1969 मध्ये अभिनेता रिचर्ड बर्टन याने तो अभिनेत्री एलिझाबेथ टेलर हिला देण्यासाठी विकत घेतला. 2011 मध्ये त्याचा जवळजवळ 97 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला.
- ‘द होप’ हीरा : अमेरिकेतील स्मिथसोनियन संग्रहालयाची शान असा याचा उल्लेख केला जात आहे. त्याचे वजन 45.52 कॅरट असून त्याचा मूळ रंग निळा आहे. मात्र, तो जेव्हा सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतो, तेव्हा लालभडक होतो. याचे मूळस्थानही भारतातलेच आहे, असे बोलले जाते. 17 व्या शतकात तो फ्रान्सचा सम्राट 14 वा लुई याने विकत घेतला. याची किंमत आजही कोणाला करता आलेली नाही. ती कित्येक कोटी असू शकेल असे अनुमान आहे.
- ब्लॅक पँथर ब्रेसलेट : ब्रिटनचा सम्राट एडवर्ड याची प्रेयसी वॉलिस सिंप्सन हिला हे ब्रेसलेट 1952 मध्ये एक भेटवस्तू म्हणून मिळाले होते. त्याला असंख्य हिरे आणि रत्ने जडविलेली आहेत. त्याचा आकारही बिबट्यासारखा आहे. हे ब्रेसलेट नंतर एका अज्ञात धनिकाने विकत घेतले. मात्र, त्याचे नाव आजही माहीत नाही. तसेच हे ब्रेसलेट सध्या कोठे आहे, याचाही शोध लागलेला नाही.
- कोहिनूर : या जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचे मूळस्थान भारतातीलच आहे. मध्ययुगात तो दक्षिण भारतात सापडला होता. नंतर तो शहाजहानच्या सिंहासनात बसविला गेला. 1813 मध्ये महाराजा रणजीतसिंग यांनी याचे स्वामित्व मिळविले. 1849 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने तो महाराणी व्हिक्टोरियाला सोपविला. आता तो राजघराण्याच्या राजमुकुटात असून त्याचे छोटे तुकडे करण्यात आले आहेत.