एचसीएलचे सीईओ सी.विजयकुमार : 2024 मध्ये 94.6 कोटी पगार
वृत्तसंस्था/ मुंबई
एचसीएल टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2016 मध्ये सी. विजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. जुलै 2021 मध्ये त्यांना कंपनीत एमडीची जबाबदारीही देण्यात आली. एचसीएल टेकचे सीईओ विजयकुमार हे भारतीय आयटी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे ठरले आहेत. 2024-25 आर्थिक वर्षात त्यांना 94.6 कोटी रुपये पगार मिळाला. यादीत दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख आहेत, त्यांना 80.6 कोटींचे पॅकेज मिळाले. दरम्यान, टेक महिंद्राचे मोहित जोशी यांना 53.9 कोटी, विप्रोच्या सीईओ श्रीनी पल्लिया यांना 53.6 कोटी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कृती वासन यांना 26.5 कोटींचे पॅकेज मिळाले. विजयकुमार यांच्या पॅकेजमध्ये 15.8 कोटींचा बेस पगार, 13.9 कोटींचा परफॉर्मन्स लिंक्ड बोनस, 56.9 कोटींचा दीर्घकालीन प्रतिबंधित स्टॉक युनिट्स आणि 1.7 कोटींचा अतिरिक्त बोनस समाविष्ट आहे.
वेतन सरासरी कर्मचाऱ्यापेक्षा 663 पट जास्त
एका अहवालानुसार, सी विजयकुमार यांना आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 7.9 टक्के पगारवाढ मिळाली. तर, सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी फक्त 3.1 टक्के वाढ झाली. या कालावधीत विजयकुमार यांचे वेतन सरासरी कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 662.5 पट होते. विजयकुमार आता 31 मार्च 2030 पर्यंत कंपनीचे एमडी आणि सीईओ पद भूषवतील.









