तामिळनाडू प्रीमियर लीगमधील घटना : अभिषेकने एका चेंडूसाठी टाकले 5 चेंडू, 3 नो, 1 वाईड
वृत्तसंस्था/ चेन्नई
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, याची प्रचिती तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये आली आहे. अखेरच्या चेंडूवर तब्बल 18 धावा निघाल्या आहेत. या चेंडूची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. क्रिकेटमध्ये एका षटकात 36 धावा निघालेल्या पाहिल्या आहेत. विजयासाठी 29 धावांची गरज असताना रिंकूने पाच षटकार मारल्याचेही पाहिले आहे, एका चेंडूत सहा धावांची गरज असतानाही पाहिलेय…. पण एका चेंडूत 18 धावा देण्याची ही कदाचीत पहिलीच वेळ असेल. तामिळनाडू प्रिमिअर लीग स्पर्धेत असे घडले आहे. अखेरच्या चेंडूवर तब्बल 18 धावा दिल्या गेल्या असून या एका बॉलचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या या सामन्यात सेलम स्पार्टन्स संघ प्रथम गोलंदाजी करत होता. तर चेपॉक सुपर गिलीज संघाने 19 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या होत्या. यानंतर डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी सालेमकडून कर्णधार अभिषेक तन्वर आला. अभिषेकने आपल्या षटकातील पहिल्या 5 चेंडूत केवळ 8 धावा दिल्या. मात्र, यानंतर अभिषेकला 5 चेंडू टाकावे लागले. यामध्ये 18 धावा आल्या. अभिषेकने डावाच्या शेवटच्या चेंडूवर चेपॉक संघाचा खेळाडू संजय यादवला क्लीन बोल्ड केले, पण हा चेंडू नो बॉल ठरला. पुढचा चेंडू फ्री हिट मिळाला, ज्यावर फलंदाजाने षटकार मारला. हा चेंडूही नो बॉल ठरला. अशा स्थितीत पुढच्या चेंडूवर 2 धावा झाल्या. पण हा चेंडूही नो बॉल होता, त्यानंतर अभिषेकने वाइड टाकला. यानंतर सामन्यातील शेवटचा चेंडू पुन्हा फेकला गेला ज्यावर फलंदाजाने षटकार मारला. अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर एकूण 18 धावा झाल्या. क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय गोलंदाजाचा हा सर्वात महागडा चेंडू ठरला. अभिषेक तवंर याने शेवटच्या चेंडूवर 18 धावा खर्च केल्या तर संपूर्ण षटकात त्याने 26 धावा दिल्या. सध्या या षटकाची जोरदार चर्चा होत आहे.
यानंतर सालम स्पार्टन्स संघाचा कर्णधार अभिषेक तन्वरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला आहे. आता अभिषेक हा भारताकडून एका चेंडूत सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे. त्याचबरोबर जागतिक क्रिकेटमधील हा विक्रम आजही क्लायंट मॅककॉयच्या नावावर आहे. ज्याने 2012-13 च्या बिग बॅश लीगमधील एका सामन्यात 1 चेंडूत 20 धावा दिल्या होत्या.
चेपॉकने सामना जिंकला
चेपॉक सुपर गिलीज आणि सेलम स्पार्टन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेपॉकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सेलम संघाला 9 गडी गमावत 165 धावा करता आल्या. चेपॉकच्या संघाने 52 धावांनी विजय मिळवत मोठा विजय मिळवला.
शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरील थरार
19.6 – तन्वरने यॉर्कर टाकला, संजय बाद. अंपायरने नो बॉल दिला.
19.6 – तन्वरने पूर्ण टॉस टाकला. संजयने षटकार ठोकला. अंपायरनेही त्याला नो बॉल म्हटले.
19.6 – तन्वर यॉर्कर टाकतो. दोन धावा घेतल्या. अंपायरने तोही नो बॉल दिला.
19.6 – हा चेंडू तन्वरने वाइड टाकला.
19.6- तन्वरने यॉर्कर टाकला, संजयने षटकार मारला.









